
ग्रामस्थांनी अनेकवेळा उपोषण आंदोलन, लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा आक्रमक पवित्रा घेऊन प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता.
वाई बाजार ( जिल्हा नांदेड ) : मागील पस्तीस वर्षापासून रेंगाळत पडलेल्या माहूर तालुक्यातील लिंबायत ग्रामपंचायतच्या नागरिकांसाठी स्मशान भूमीचा प्रश्न कायम होता. भूसंपादन अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंगळवार (ता. पाच) रोजी भूमी अभिलेख विभागाने स्मशानभूमीसाठी संपादित जमिनीची मोजणी करुन हद्द निश्चित केल्याने लिंबायत वासियांच्या वर्षानुवर्षाच्या खितपत पडलेल्या मागणीला मूर्तरुप मिळाले आहे.
माहूर तालुक्यातील लिंबायत नेर गावाचे पस्तीस वर्षांपूर्वी पुनर्वसन झाले होते. तेंव्हापासून आजपर्यंत अत्यावश्यक गरज असलेले स्मशान भूमीला जागा नसल्याने मृत्यू पश्चात मृतदेहाच्या विटंबनेला समोरे जावे लागत होते. यासाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा उपोषण आंदोलन, लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा आक्रमक पवित्रा घेऊन प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु प्रशासनाला काही केल्या जाग येत नव्हती. कारण विषय जमीन संपादन करण्याचा असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात लालफितीत पडला होता. वारंवार आंदोलन करुन प्रशासन स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देत नसल्याने व्यथित होऊन येथील सरपंच रंजना सुभाष दवणे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा देखील दिला होता. हा विषय सकाळने लावून धरला होता.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात दोन हजार एकरवर होणार तुतीची लागवड -
पस्तीस वर्षांपासूनच्या मागणीला मूर्तरुप
अखेर जिल्हा प्रशासनाने स्मशाभूमीच्या जागेसाठी लिंबायात येथील लक्ष्मीबाई विठ्ठल मोरे यांच्या गट क्रमांक ७४ मधील वीस गुंठे इतके क्षेत्र संपादित करण्यासाठी जमीन मोजणीची कार्यवाही करण्यात आली आहे. स्मशानभूमीच्या जागेसाठी मंगळवारी (ता. पाच) रोजी उप अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाचे मुख्यालय सहाय्यक एम. जी. कदम, भूमापक सय्यद अजमत अली, छाननी लिपिक एम. बी. मरदोडे यांनी काम पाहिले. तर मोजणी कर्मचारी यांना सहकार्य म्हणून ग्रामसेवक राजु तोटावाड, अविनाश धनावत, मनोहर टोमकाकटे, आनंद मोरे, जयकांत मोरे, दादाराव दवणे, दिलेरसिंग चुंगडे,आनंदसिंग चुंगडे ग्रामपंचायत कर्मचारी कैलाश बर्डे यांनी सहकार्य केले. एकंदरीत लिंबायात, नेर वासियांची पस्तीस वर्षांपासूनच्या मागणीला मूर्तरुप मिळाले आहे.
नांदेड जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
स्मशानभूमीसाठी जमीन संपादित करण्यात आली
लिंबायत येथील स्मशानभूमीसाठी प्रशासनाने सुरुवातीला मालवाडा येथील जमिनीसाठी होकार दिला होता. परंतु ग्रामस्थांनी ती जागा गैरसोयीची असल्याचे सांगितल्याने व लिंबायत येथील लक्ष्मीबाई विठ्ठल मोरे यांची जमीन योग्य असल्याने गावकऱ्यांसाठी जे सोयीचे ठरेल तो निर्णय घेऊन स्मशानभूमीसाठी जमीन संपादित करण्यात आली आहे.
- सिद्धेश्वर वरणगावकर, तहसीलदार, माहूर
संपादन- प्रल्हाद कांबळे