नांदेडच्या कापूस संशोधन केंद्रात आजपासून मिळणार रब्बी बियाणे

प्रमोद चौधरी
Monday, 28 September 2020

नांदेड जिल्ह्यातील व परिसरातील शेतकऱ्यांनी परभणी येथून बियाणे आणण्याची गैरसोय टळणार असल्याचे, संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग यांनी सांगितले. 

नांदेड : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारीत आणि विद्यापीठाच्या प्रक्षेत्रांवर उत्पादीत करण्यात आलेल्या प्रमुख रब्बी पीकांचे बियाणे नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील व परिसरातील शेतकऱ्यांनी परभणी येथून बियाणे आणण्याची गैरसोय टळणार असल्याचे, संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग यांनी सांगितले. 

हरभरा पीकाचा ‘बीडीएनजी’ ७९७ (आकाश) हा देशी वाण असून कोरडवाहू लागवडीसाठी योग्य वाण आहे तर ‘बीडीएनजीके’ ७९८ हा काबुली प्रकारातील वाण असून बागायती लागवडीसाठी सुयोग्य आहे. रब्बी ज्वारीचा एसपीव्ही १४११ (परभणी मोती) हा मोत्यासारखे चमकदार - टपोरे दाणे व भाकरीची उत्तम चव असणारा वाण आहे. सीएसव्ही १८ (परभणी ज्योती) हा उंच वाढणारा बागायतीसाठी उत्तम वाण आहे तर एसपीव्ही २४०७ (सुपर मोती) हा धान्य व कडबा दोन्हीकरीता लागवडीस योग्य वाण आहे. 

हेही वाचाच - नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमोर दुहेरी आव्हान, कोणते? ते वाचाच

करडई पीकाचे पीबीएनएस १२ व पीबीएनएस ८६ हे दोन्ही वाण कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी योग्य आहेत. जवस पीकाचा ‘एलएसएल’ ९३ हा कोरडवाहू लागवडीमध्ये अधिक उत्पादनक्षम वाण आहे. सदरील बियाणे सोमवार (ता. २८ सप्टेंबर) पासून कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत विक्री करण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे अवाहन कापूस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग यांनी केले आहे. 

उपलब्ध बियाणे वाण पिशवीचे वजन किंमत 
हरभरा बीडीएनजी ७९७ (आकाश) १० किलो ग्राम ७५० रुपये 
हरभरा बीडीएनजीके ७९८ १० किलो ग्राम एक हजार रुपये 
करडई पीबीएनएस १२ (परभणी कुसुम) पाच किलो ग्राम ४५० रुपये 
करडई पीबीएनएस ८६ (पूर्णा) पाच किलो ग्राम ४५० रुपये 
रब्बी ज्वारी एसपीव्ही १४११ (परभणी मोती) चार किलो ग्राम २८० रुपये 
रब्बी ज्वारी सीएसव्ही १८ (परभणी ज्योती) चार किलो ग्राम २८० रुपये 
रब्बी ज्वारी एसपीव्ही २४०७ (सुपर मोती) चार किलो ग्राम २८० रुपये
जवस एलएसएल ९३ पाच किलो ग्राम ४०० रुपये 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rabbi Seeds Will Be Available From Today Nanded News