Rahul Gandhi : प्रकल्प नाही महाराष्ट्राचे भविष्य गेले ; राहुल गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

Rahul Gandhi : प्रकल्प नाही महाराष्ट्राचे भविष्य गेले ; राहुल गांधी

कृष्णूर (जि. नांदेड) : महाराष्ट्रात होणारा एअरबस, वेदांचा फॉक्सकॉन हे प्रकल्प गुजरातला गेले. ते कोणामुळे गेले हे सगळ्यांनाच माहीत आहे. केवळ हे प्रकल्पच महाराष्ट्रातून गेले नाहीत तर महाराष्ट्राचे भविष्यच गेले, अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (ता. नऊ) सायंकाळी येथे झालेल्या कॉर्नर सभेत केली.

राहुल म्हणाले, "गुजरातला गेलेले हे प्रकल्प चार नावाशिवाय इतर कुणाला मिळणार नाहीत. ही चार नावे तुम्हालाही माहित आहेत. लोकांना ऐकण्यासाठी ही यात्रा आहे. रोज सात-आठ तास चालून छोटे व्यापारी, युवक, शेतकरी, माता-भगणी यांच्याशी संवाद साधत आहे. त्यांचे दु:ख ऐकत आहे. तेही त्यांचे ज्ञान मला मोफत देत आहेत. नोटाबंदी ही चूक नव्हती. छोटे-मध्यम व्यापार्‍यांना संपवून मोठ्या उद्योगांसाठी नोटाबंदी, जीएसटी हा मोदींचा धोरणात्मक निर्णय आहे. आपले शिक्षण धोरण कसे चुकीचे आहे हे मला आज स्वराज नावाच्या नवतरुणाने समजून सांगितले. तो खरा शिक्षणतज्ज्ञ आहे. माध्यमे आमचा आवाज दाबत आहेत, कारण मीडियाचे मालकही तेच आहेत", असा आरोपही त्यांनी केला.

कॉर्नर सभा नव्हे जाहीर सभा

राहुल हे कॉर्नर सभेत दहा-पंधरा मिनिटांवर अधिक बोलत नाही. लांब भाषण देणे हा आपला उद्देश नसल्याचे त्यांनी सांगितले. पण, येथे झालेल्या या सभेला मोठी गर्दी होती. त्यामुळे राहुल यांनी 31 मिनिटे भाषण केले. गर्दीला प्रश्नही विचारले. त्यामुळे ही सभा जणू जाहीर सभा झाली.

.. अन् गर्दी स्तब्ध झाली

राहुल यांनी सांगितले, "आज मी सहा-सात वर्षीय एका मुलीशी संवाद साधला. तिने सांगितले माझ्या पेक्षा आई-वडील माझ्या भावावर अधिक प्रेम करतात. महाराष्ट्रात असे होते हे योग्य आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. हे ऐकून गर्दी गंभीर आणि स्तब्ध झाली. मुला-मुलीत भेद करू नका, असे आवाहन त्यांनी करताच लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.