esakal | धर्माबाद परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; दोन लाखाचा मुद्देमाल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा


धर्माबाद जुगार

धर्माबाद परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By
सुरेश घाळे

धर्माबाद ( जिल्हा नांदेड ) : धर्माबाद तालुक्यातील करखेली शिवारात कोरड्या नाल्यामध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी (ता. आठ) सायंकाळी पाच वाजता धाड टाकून दोन लाखाच्यावर मुद्देमाल जप्त केला आहे. या धाडीत १९ आरोपी फरार झाले असून सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

तालुक्यातील करखेली शिवारात कोरड्या नाल्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून करखेली येथील कैलास नामदेव खांडरे हा आरोपी पत्ता जुगाराचा अड्डा हा नियमित चालवीत होता. हा जुगार अड्डा नियमित सुरु असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांना मिळाली. त्यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांच्या पथकाला सुचना दिल्या. श्री. कत्ते यांनी शेषराव कदम, शिरीष मांजरमकर, श्री. नागेश्वर, श्री. तेलंग, श्री. बोधनापोड, श्री. राखे, श्री. थेटे, श्री. गुट्टे या पोलिस अंमलदारांना सोबत घेत दिलेल्या माहितीवरुन जुगार अड्ड्यावर छापा टाकला. जुगार्‍यांना याची चाहूल लागताच १९ जुगारी हे फरार होण्यात यशस्वी झाले. मात्र जयवंत खांडरे, चंद्रकांत सोनटक्के, राजेश्वर काळेवार, प्रमोद खांडरे, संतोष खांडरे (सर्व रा. करखेली) व बालाजी शेलार (रा. उमरी) हे सहा आरोपीना अटक केले.

हेही वाचा - यापूर्वीही एका खासदारांचं जात प्रमाणपत्र झालं होतं रद्द

फरार कैलास खांडरे, संभाजी श्रीखंडे, योगेश जंगलेकर, साहेबराव बत्तलवाड, शेट्टीबा दंडलवाड, यलप्पा वलपे (सर्व रा. करखेली), शिवाजी चव्हाण (रा. बोळसा ), अंकुश कावळे (रा. उमरी), गंगाधर पिराजी, भगवान भरकड (रा. गोरठा), शंकर भरकड (रा. गोरठा) अशी नावे समोर आली आहेत. उर्वरित आठ जणांची नावे समजली नाहीत. दरम्यान, घटनास्थळावरुन पोलिसांनी जुगाराचे साहित्ये व आठ हजार ४५० रोख रक्कमेसह नऊ मोटारसायकल ज्याची किंमत दोन लाख १० हजार रुपये असा एकूण दोन लाख १८ हजार ४५० रुपये मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अंमलदार शेषराव कदम यांच्या फिर्यादीवरुन धर्माबाद पोलिस ठाण्यात सर्व संशयित आरोपींविरुद्ध पत्ता जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी वरील सहा आरोपी हे ताब्यात असून उर्वरित १९ आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून करखेली व करखेली रेल्वेस्टेशन परिसरात मटका, अवैध दारु विक्री व इतर अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला असून त्यावरही कारवाईची मागणी होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top