Video - नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

प्रमोद चौधरी
Sunday, 20 September 2020

नांदेड जिल्ह्यात नदी काठच्या गावांमध्ये तसेच शेत शिवारामध्ये पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा ठिकाणी जावून जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

नांदेड : सततच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच प्रकल्प तुडुंब भरल्याने पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रामध्ये सुरु आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांमध्ये तसेच शेत शिवारामध्ये पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा ठिकाणी जावून जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस, अतिवृष्टी आणि नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे नांदेड जिल्हात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हातील पाच तालुक्यात अतिवृष्टी देखील झाली. याशिवाय वरच्या धरणातुन मोठ्या प्रमाणात पाणी  सोडण्यात आले आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने नऊ दरवाज्यांद्वारे गोदावरीच्या पात्रामध्ये सुमारे एक लाख क्युसेक्स पाणी सोडले जात असल्याने गोदावरी दुथडी भरून वहात आहे.

हेही वाचा - दत्ता बापूंनी जमिनीशी नातं कधीच तुटु दिले नाही

गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने गोदाकाठच्या तसेच अन्य नदी नाल्यांचे पाणी गावासह शेत शिवारात घुसले आहे.  त्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. सोबतच ज्वारी, तूर, कापूस या पिकांना देखील पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती खरडुन निघाली, तर शेतात मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचलं आहे. नांदेडसह मुखेड, धर्माबाद, बिलोली आणि देगलूर या पाच तालुक्यातील नदी काठच्या गावात शेतीचे मोठे नुकसान झाले. 

हे देखील वाचाच - परभणी : दुधना धरणाचे चार दरवाजे अर्ध्यामिटरने उघडले

जिल्हाधिकाऱ्यांनी दिला शेतकऱ्यांना धीर
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हैराण झालेला आहे. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लावल्या होत्या. मात्र, गत चार-पाच दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या असून, डोळ्यादेखत हातातोंडाशी आलेले पीक नेस्तनाबूत झाले आहे. दरम्यान शनिवारी (ता.१९) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह पूर परिस्थिती आणि शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे तातडीने  पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना तसेच शासनाच्या आदेशानुसार ३३ टक्याहुन जास्त नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे येत्या तीन दिवसात करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन शेतकऱ्यांना दिले. 

सहा एकरातील पिकांचे नुकसान
माझी सहा एकर शेती आहे. त्यामध्ये यंदा मी कापूस, सोयाबीन आणि तूर ही पिके घेतलेली होती. मात्र, आसनाचे पाणी शेतात घुसल्याने तीनही पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत शासनाने द्यावी. 
- शिवाजी अडसुळे, शेतकरी

शेंगांना फुटले मोड
सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पिकाचे नुकसान झाले आहे. झाडाला लटकलेल्या शेंगांना मोड फुटले असून, प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, हीच अपेक्षा आहे. 
- रामराव पवार, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Damage To Crops In Nanded District Nanded News