नांदेड जिल्ह्यात मूग, उडीद पिकांचे नुकसान, कशामुळे? ते वाचाच

अमोल जोगदंड
Tuesday, 18 August 2020

मागील आठवडाभरापासून सततच्या रिमझिम पावसाने मूग, उडीद पिकांच्या शेगांना प्रत्यक्ष मोड (अंकुर) आल्याने शेतकरी कमालीचा अडचणीत सापडला आहे. 

मालेगाव (जि.नांदेड) : मूग, उडीद या पिकांच्या शेंगा तोडणीला आल्या; परंतु मालेगाव व परिसरात मागील आठवडाभरापासून सततच्या रिमझिम पावसाने मूग, उडीद पिकांच्या शेंगांना प्रत्यक्ष मोड (अंकुर) आल्याने शेतकरी कमालीचा अडचणीत सापडला आहे. प्रशासनाने तत्काळ पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
 
यंदा मालेगाव आणि परिसरात सोयाबीन, मूग, उडीद पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. परंतु मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे निघाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला. परंतु दुबार पेरणी केल्यावर मूग, उडीद पिकांना बऱ्यापैकी शेंगा लागल्या व त्या तोडणीस आल्याने शेतकरी समाधानी झाला; परंतु मागील आठवडाभरापासून सततच्या रिमझिम पावसामुळे तोडणीस आलेल्या मूग, उडीद पिकांच्या शेंगांना प्रत्यक्ष मोड फुटले असल्याने शेतकरी कमालीचा अडचणीत आला असल्याने त्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

काय म्हणतात शेतकरी... 

मागील चार वर्षांपासून शेतकरी नेहमीच विविध संकटांना सामोरा जात आला आहे. परंतु यंदाही त्याच्या हातातोंडाशी आलेला घास त्याच्याच डोळ्यांदेखत वरुणराजाने हिरावून नेला. यंदा पाऊस समाधानकारक झाला असलातरी शेतकरी समाधानी नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर विमा कंपनी व प्रशासनाचे अधिकारी यांनी त्वरित पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
 
कृषी विभागाने नुकसान भरपाई द्यावी... 
 
यावर्षी आम्ही‌ ओमशांती ऑर्गनिक फार्मर सेंद्रिय शेतीगटातील सर्व शेतकऱ्यांनी एक एकर डाळवर्गीय पीक घेतले. छोट्या मुलाप्रमाणे सांभाळले. दोन-तीन  वेळा कोळपणी, निंदणी, जीवामृत, दशपर्णी अर्काची फवारणी केली. मूग, उडीद पिकाला शेंगाही चांगल्या लागल्या व तोडणीला आल्यानंतर सतत पाऊस सुरु असल्याने मुगाच्या शेंगांना जागेवरच मोड आले. शेंगा तोडणीसाठी मजूरही येत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेंगा खराब झाल्या आहेत. यंदा १ एकरमध्ये १ ते २ क्विंटल शेंगाही निघतील की नाही याचीही शाश्वती नाही. कृषी विभाग व प्रशासनाने विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतीनिष्ठ शेतकरी भगवान इंगोले यांनी केली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rains have damaged mug and urad crops in Nanded district