जातीय तंटे आणि वादापेक्षा गावाचा समग्र विकास अधिक मोलाचा- रामदास आठवले

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 3 March 2021


केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी मौ. शिवनी जामगा गावात जाऊन पिडीत कुटूंबांची केली विचारपूस

नांदेड : जातीय तणावातून निर्माण होणाऱ्या हल्ल्याचे कोणीही समर्थन करणार नाही. असे हल्ले हे मानवतेच्या दृष्टिनेही लज्जास्पद असून यात कोणाचा तरी जीव जाणे ही प्रवृत्ती गंभीर आहे. जातीपातीच्या पलीकडे गावातील एकात्मता आणि सौहार्दता हाच विकासाचा मुळ पाया असून अशा वादांपेक्षा प्रत्येक गावाने विकासाच्या मुद्दयावर एकत्र येवून खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी पुढे सरसावणे अधिक महत्वाचे आहे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात अवघ्या तीन हजार 500 लोकसंख्या असलेल्या मौजे शिवणी जामगा येथे ता. 23 फेब्रुवारी रोजी सांयकाळी किरकोळ वादावरुन निर्माण झालेल्या वादात एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला. या तरुणावर औरंगाबाद येथे पुढील उपचार सुरु असून या पिडीत कुटूबिंयाना भेट देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मंगळवारी (ता. दोन)  दुपारी मौजे शिवणी जामगा गावात आले होते. त्यांनी पिडीत कुटूबिंयांशी चर्चा केल्यानंतर गावकऱ्यांशी संवाद साधला.

पिडीत कुटूबिंयाना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली असून उर्वरित रक्कम आणखी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तेजस माळवदकर, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार बोरगावकर, गावचे सरपंच छत्रपती स्वामी महाराज, उपसरपंच तुकाराम जामगे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सामाजिक एकोप्यावर अधिक भर दिला. मी या गावात तणाव निवळण्यासाठी आलो असून यात निर्दोष असलेला कोणताही व्यक्ती भरडला जावू नये. याची आपण सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा आणि प्रशासनाच्यावतीने हा प्रश्न योग्य तऱ्हेने हाताळला असून पोलिस कार्यवाहीबद्दलही मी समाधानी आहे. विनाकारण ज्यांचा सबंध नाही अशा गावकऱ्यांविरुध्द कार्यवाही करणे योग्य नाही. ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांनीही जे यात सहभागी होते. तेवढ्याच लोकांची नावे दिली असून त्यांच्याविरुध्द पोलिस प्रशासनाने कार्यवाही केल्याचेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas recalled that the overall development of the village is more important than ethnic disputes and disputes nanded news