चक्क वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यालाच मागितली खंडणी...काय आहे प्रकरण?

प्रल्हाद कांबळे
Monday, 17 August 2020

दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांविरुद्ध भोकर पोलिसांनी खंडणीचा रविवारी (ता. १६) गुन्हा नोंदविला

नांदेड : जिल्ह्यातील भोकर येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांविरुद्ध भोकर पोलिसांनी खंडणीचा रविवारी (ता. १६) गुन्हा नोंदविला आहे. या खंडणीखोरांनी खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

भोकर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष नारायण हिवरे यांना ता. आठ ऑगस्ट रोजी दोन ते तीन वेळेस चलभाष यंत्रावरुन फोन करून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी नाही दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीवरुन आशिष हिवरे यांनी भोकर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन गोपीनाथ बालाजी मुंगल रा.धनेगाव आणि संभाजी रामजी उबाळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचा - महावितरण : कोरोना यौध्यांचा मुख्य अभियंत्याकडून गौरव

पतीने मागितली पत्नीलाच खंडणी

तर दुसऱ्या घटनेत पतीने पत्नीला फोन करून तीन लाखाची खंडणी मागितली. ही घटना मुखेड येथील असून रुकसाना बेगम ही माहेरी असताना पतीने तिला फोन वरून संदेश पाठवीत माझ्या वरील गुन्हा परत घे, तसेच मला तीन लाख रुपये आणि तुझ्या सर्व परिवाराचा अपघात करून खून करतो अशी धमकी दिली. या प्रकरणात पीडित महिलेच्या तक्रारीवरून पती अहमद शेख याच्या विरोधात मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेती परत करण्यास टाळाटाळ

मुलीच्या लग्नासाठी चार हजार रुपये उसने घेतल्यानंतर त्याची व्याजासह परतफेड केल्यानंतरही लिहून घेतलेली जमीन तक्रारदाराला विक्री करण्यासाठी परत दिली नाही. यानंतर ही जमीनीसाठी पाच लाख रुपये घेऊनही जमिनीची रजिस्ट्री करून न देता फसवणूक करणाऱ्या एकाविरुद्ध मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यशवंत गोविंद शिंदे रा. बामणी यांनी रेवाप्पा शंकराप्पा गंदीगुडे यांच्याकडून मुलीच्या लग्नासाठी चार हजार रुपये उसने घेतले होते. परतफेडीच्या हमीसाठी 0.82 जमिनीची रजिस्ट्री करून दिली होती. दोन वर्षानंतर शिंदे यांनी गंदी गुडे यांना बारा हजार रुपये परत केले. त्यानंतर शिंदे यांनी गंदीगुडे यांना जमीन परत माझ्या नावावर करून द्या अशी विनंती केली. परंतु गंदीगुडेनी चालढकल केली. शेवटी श्री. शिंदे यांनी मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन गंदीगुडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ransom demanded from the forest range officer what is the matter nanded news