आईबद्दल खूप वाचले आता ‘बापा’बद्दलची कविता वाचा

प्रल्हाद कांबळे
Saturday, 19 September 2020

मी जन्मण्याआधीपासूनच माझ्या बापाला असलेले माझे मोल आणि माझ्या आईने सांगितलेले त्यांच्याविषयीचे बोल आज मला आठवत आहेत बापाबद्दल लिहिताना.

नांदेड : आई सांगत असते नेहमी, " नऊ महिने तुझ्या बाबांनी घेतली माझी काळजी तू गर्भाशयात असताना;
मला समजलं नंतर, दवाखान्यात मला दाखल केल्यानंतर ते काळजी करत होते, बाहेर बसून तुझा जन्म होताना;
डोळ्यात त्यांच्या आनंद मावत नव्हता तुला पहिल्यांदा हातात घेताना; अख्ख्या गावाला साखर वाटली त्यांनी तुझ्या जन्माचा आनंद व्यक्त करताना;"

मी जन्मण्याआधीपासूनच माझ्या बापाला असलेले माझे मोल आणि माझ्या आईने सांगितलेले त्यांच्याविषयीचे बोल आज मला आठवत आहेत बापाबद्दल लिहिताना.

                                             ‘ बाप ’

आई शिकवण देते, चांगलं वळण लावते हे दिसून आलं लहानाचं मोठं होताना;
पण ते करण्यामागे अप्रत्यक्षरीत्या बापाचाही हात होता हे समजून येतं, आता समज आली असताना;
अचानक कधी आजारी पडल्यावर आई दिसते आपल्या मुलाची काळजी घेताना;
पण वडील कधी दिसत नाहीत मुलाच्या आजारपणात  स्वतःच्या मनाची झालेली तगमग सर्वांना दाखवताना,
एरवी पैसे मागितल्यावर कारणे विचारणारा तो पैशांची चिंता करत नाही मुलावर उपचार करताना;
स्वतःच्या मनातील भावना कधीही प्रकट न करणारा तो, आपल्याबद्दल अतिशय भावनिक आणि संवेदनशील आहे हे आठवलं मला आज बापाबद्दल लिहिताना......

मुलाच्या जन्मापासूनच तो दिसतो त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी योजना आखताना;
काही कारणास्तव आपली स्वप्ने अपूर्ण राहिली तशी मुलाची राहू नये म्हणून दिसतो तो रात्रंदिवस कष्ट करताना; 
इच्छा खूप असते त्याचीही मुलाची प्रत्येक गरज, हौस पूर्ण करण्याची, तो दिसतो ही ते पूर्णत्वाला नेताना;
पण गरजा आणि हौस पूर्ण केली म्हणून दिसत नाही तो कधी त्याचा परतावा मागताना;
त्याची मुलासाठीची तळमळ, त्याच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो हे सर्व काही आज बापाबद्दल लिहिताना.....

हेही वाचा -  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयासाठी आता दहा हजार क्षमतेच्या ऑक्सीजन टँक -

बऱ्याच वेळा ऐकलं बापानां मुली नको असतात असा गैरसमज, समाजात मी वावरताना;
पण समाजाच्या वाईट नजरा, स्वतःचा फाटका खिसा ह्यांची भीती वाटत असावी त्याला त्याची मुलगी जन्माला येत असताना;
जर त्याला मुलगी नकोच असती ना तर तो दिसला नसता कधी लग्नानंतर ती सासरी निघाल्यावर रडताना;
मुलींनाच समजत असावं बापाने त्यांना लहानपणापासून किती जपलं, त्यांसाठी काय काय केलं, उगाच सांगत नसाव्यात त्या Daddy's princess असं  कुणाला, स्वतःची ओळख करून देताना;
बापाची मुलीबद्दलची काळजी, तिच्यावरच अतोनात प्रेम आणि तिला असलेली त्याची जाणीव समजत आहे मला आज हे बापाबद्दल लिहिताना........

शिवरायांनी अख्ख आयुष्य घातलं  स्थापन केलेल्या स्वराज्यातील रयतेचा राजा बनून तिचा बापासारखा सांभाळ करताना; 
स्वराज्याच्या छाव्याला ही जाणीव झाली असावी बापाच्या महान कार्याची त्यांनी सोपवलेली जबाबदारी पुढे पार पाडताना;
शिवरायांची साथ, त्यांचा पाठीशी हात आणि त्यांचा मुलावरील विश्वास, त्यांची शिकवण हे सगळं आठवलं असेल  शंभूराजेनाही महाराज सोडून गेले असताना;
शंभूराजांनी ही स्वतःचे प्राण अर्पण केले वडिलांनी स्थापलेल्या स्वराज्याच रक्षण करताना;
शिव शंभू ही बाप लेकाची इतिहास रचणारी जोडीही आठवली मला आज बापाबद्दल लिहिताना......

येथे क्लिक कराहिंगोली : ७५ लक्ष रुपयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेला मंजुरी

स्वतः चा सगळा वर्तमानकाळ मुलाच्या भविष्यासाठी बाप दिसतो पणाला लावताना;
दिसतो तो आपल्या मुलाच्या भरभराटीसाठी आणि मुलीच्या सुखी संसारासाठी देवाकडे मागणी करताना;
पै पै जमा करतो, प्रसंगी कर्ज ही काढतो मुलीचं लग्न लावताना;
कमावलेलं सगळं देवून जातो मुलाला तो हे जग सोडताना;
प्रत्येक बापाचं निस्वार्थ प्रेम आणि त्यागी स्वभाव आठवतो आज मला बापाबद्दल लिहिताना......

मूल जन्मल्यापासून दिसतो बाप त्यासाठी सगळं काही करताना;
दिसत नाही कधी तो तेव्हा आयुष्यात त्यानंतर स्वतः साठी जगताना;
मुलांच्या अडीअडचणींना दिसतो तो सामोरा जाताना, मुलगा एखाद चांगलं काम करत असेल तर दिसतो तो साथ देताना, तर कधी मिळवलेल्या यशासाठी पाठ थोपटताना;
खंबीर पणे उभा राहतो तो मुलाच्या पाठीशी सगळे विरोधात असताना;
कृतज्ञता व्यक्त करावं वाटत आहे आज यानिमित्ताने बापाबद्दल लिहिताना......

पण आज मी बघतोय समाजात काहीच वाटत नाहीये बऱ्याच जणांना स्वतः चा बाप वृद्धाश्रमात सोडताना;
लाज वाटत आहे ऐकून कुणीतरी बाहेर देशातून वडिलांचा ऑनलाईन अंत्यविधी उरकताना;
तर काही जण दिसत आहेत वृद्ध आईवडिलांना परदेशातून पैसे पाठवून जबाबदारी पार पाडल्याच समाधान बाळगताना;
दिसत नाहीत बरेच जण बाप जिवंत असताना त्याची देखभाल करताना, दिसतात ते फक्त बाप नसल्यावर पितृ पूजा करताना; वाईट वाटत आहे हे सगळं बापाबद्दल लिहिताना .....

हे उघडून तर पहास्वारातीम विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्राला मंजुरी- उदय सामंत

आपल्याला जन्म देवून, वाढवून, लहानच मोठं करून दिसतात ते स्वतःच सगळं काही मुलाला देवून टाकताना;
बऱ्याच जणांना पाहतो निस्वार्थ वडिलांचं प्रेम समजतं, आज जगात ते नसताना; 
त्यांच्या उपकारांची परतफेड करणे शक्य नाही पण कृतज्ञता म्हणून त्याची काठी होवूया त्यांच वय वाढताना;
त्यांनी आपल्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट आठवूया त्यांची सेवा करताना;
त्यांना गर्व वाटेल असं काम करूया, दिला त्यांनी आपल्याला आयुष्यभर आनंद त्यांनाही आपण देवू या, वडिलांवर प्रेम करूया एवढंच सांगायचंय मला सगळ्यांना आज बापाबद्दल लिहिताना......

माझा पहिला मित्र असलेला माझा बाप आजपर्यंत कधी दिसला नाही कुठेच माझी साथ सोडताना;
देवाचे नाही पण त्या देवासारख्याच देवमाणसाचे दर्शन नक्कीच भेटले मला, त्यांच्या संपर्कात वाढताना;
माफ करा पण बाप शब्दात सांगणं कठीणच, संक्षिप्त रूपात लिहिताच आलं नाही त्याच्याविषयीच काव्य रचताना 
मित धन्य झाला आज निस्वार्थी बापाची महती कवितेच्या माध्यमातून सांगताना;
नतमस्तक झाला आहे तो हे सगळं काही बापाबद्दल लिहिताना.....

कवी- सुमित चंद्रकांत वानखेडे, विद्यार्थी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read a lot about mother, now read a poem about 'father' nanded news