| 
						  
						उमरी - शेतीचा वाद आणि धुऱ्याची भांडणे ही काही नवी नाहीत. कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात आणि गावात कमी अधिक प्रमाणात ही भांडणे सुरुच असतात. प्रसंगी एकमेकांचे खून करण्यातही काही जण मागे पुढे पाहत नाहीत. अशीच एक घटना नांदेड जिल्ह्याल उमरी तालुक्यात असलेल्या बोळसा बुद्रुक गावात घडलीय. शेतीच्या वादातून एका लहान भावाने मोठ्या भावाचा खंजीर पोटात भोसकून खून केला आहे. 
						 
						बोळसा बुद्रुक (रेल्वेस्टेशन) (ता. उमरी, जि. नांदेड) या गावात शेतीच्या कारणावरून छोट्या भावाने मोठ्या भावाच्या पोटात खंजीर भोसकून खून केला; तसेच त्याच्या मुलालाही मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. ३१) रात्री बाराच्या सुमारास घडली. याबाबत धर्माबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी माहिती दिली. 
						 
						हेही वाचा - मुखेडच्या चांडोळा सज्जाचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात 
						 
						मोठ्या भावासह मुलांवर हल्ला 
						बोळसा बुद्रुक येथे दोन भावांच्या शेतीच्या वादावरून शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास भांडण झाले. यावेळी आरोपी माणिक गंगाराम चिकटवाड याने त्याचा सख्खा भाऊ धाराजी गंगाराम चिकटवाड (वय ६०) यास खंजीरने पोटात भोसकले; तसेच त्याचा मुलगा दीपक धाराजी चिकटवाड याला दगडाने डोक्यात मारहाण केली. या दोघांना उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री दीडच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर चव्हाण यांनी धाराजी गंगाराम चिकटवाड यास मृत घोषित केले. मृताचा मुलगा दीपक याला डोक्यात गंभीर मार असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 
						 
						मुलाने दिली फिर्याद 
						या घटनेनंतर भोकर येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, धर्माबादचे पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, सहायक पोलिस निरीक्षक कराड यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस कर्मचारी सूर्यकांत नागरगोजे, जाधव, ढगे, वैजनाथ कानगुले, गुरू पवार यांनी पुढील कारवाई केली. मुलगा दीपक चिकटवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक माछरे यांनी दिली. 
						 
						हेही वाचलेच पाहिजे - या शहरात साकारणार शांतीचे आकर्षक प्रतिक, कोणत्या ते वाचा..? 
						 
						मिनी ट्रॅक्टर, उपसाधनांसाठी १६३ बचतगटांचे अर्ज पात्र 
						अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांसाठी २०१८ - १९ या वर्षात मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी ३६५ बचतगटांनी अर्ज केली होती. त्यातील १६३ बचतगटांचे अर्ज तपासणीअंती पात्र ठरली आहेत. या पात्र बचतगटांची यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. संबंधित बचतगटांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना ९० टक्के अनुदानावर नऊ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनाचा पुरवठा करण्याची योजना आहे. शासन निर्णय ता. आठ मार्च २०१७ अन्वये या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. अपात्र बचतगटांना अर्जातील त्रुटींची पुर्तता करण्यासाठी चारवेळा संधी देण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जे अपात्र किंवा ज्या बचतगटांनी मुळ कागदपत्रे समाज कल्याण कार्यालयाकडून तपासून घेतली नाहीत त्यांना तीन दिवसाची मुदत देण्यात आली होती. अध्यक्ष, सचिव व बचत गटातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, सक्षम अधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बचतगटाचे नोंदणी प्रमाणपत्र, चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना, बचतगटाचा शिक्का आणि अध्यक्ष सचिव यांचे बँकेला आधार लिंकचे प्रमाणपत्र या पुराव्यासह बचतगटाचे अध्यक्ष व सचिवांना मुदतीत मुळ कागदपत्रे समाज कल्याण कार्यालयास कार्यालयीन वेळेत सादर करण्याची अंतिम संधी देण्यात आली होती, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 
						 |