नांदेडला रिपब्लिकन सेनेतर्फे जातीय हल्ल्याचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात राज्यात दलित अत्याचाराच्या घटनात कमालीची वाढ  झाली असून या जातीय हल्ल्याचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने नांदेडला निषेध करण्यात आला. तसेच इतर विविध मागण्यांचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. 

नांदेड - कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात राज्यात दलित अत्याचाराच्या घटनात कमालीची वाढ  झाली असून या जातीय हल्ल्याचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने नांदेडला निषेध करण्यात आला. तसेच इतर विविध मागण्यांचे निवेदन सोमवारी (ता. २९ जून) जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. 

हिंगोली जिल्ह्यातील सोमठाणा व सावरखेडा या घटनेचाही रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला व विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

हेही वाचा - कोरोनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती उच्च न्यायालयात जाणार 

सामूहिक जातीय हल्ले वाढले​

जगभरात कोरोना महामारीचे सावट देशात आणि महाराष्ट्रातही कोरोनाचा संसर्ग सुरुच आहे. त्याचबरोबर या काळात राज्यात दलित अत्याचाराच्या घटनात कमालीची वाढ झाली असून मागील दोन महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी दलितांवर विशेषता बौद्ध समाजावर सामूहिक जातीय हल्ले करण्यात आले आहेत. या सर्व जातीय जाती हल्ल्याचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. 

इतरही मागण्यांचा समावेश 
या संदर्भातील निषेधाचे व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांना पाठवण्यात आले. त्याचबरोबर राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व ज्यांचे पोट हातावर आहे, असे नागरिक त्रस्त आहेत. अशातच महावितरण कंपनीने अवाच्या सव्वा वीजबिल नागरिकांना दिले आहेत. त्यामुळे हे वीजबिल त्वरित रद्द करून केवळ तीनशे युनिटप्रमाणे ग्राहकांना वीजबिले द्यावीत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निराधारांना घरकुले देण्याची मागणी
नांदेड शहरातील श्रावस्तीनगर, लालवाडी भागातील निराधार व ज्यांचे नांदेड शहरात घर नाही किंवा स्वतःची जागा नाही अशा नागरिकांसाठी घरकूल बांधण्यात आले आहेत, मात्र सदरील घरकुलात अशा लोकांना विशेषता विधवा, अपंग, निराधार अशा लोकांना सदरील घरे देण्यात येत नाहीत. असे नागरिक सगळे घरात वास्तव्यास गेल्यानंतर त्यांना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बळजबरीने घराबाहेर काढले जात आहे. याकडेही महापालिका व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी निवेदनात अशा निराधार लोकांना सदर विभागातील घरकुले उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

हेही वाचलेच पाहिजे - शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : अखेर ‘त्या’ सोयाबीन उत्पादक कंपनीवर नांदेडात गुन्हा दाखल 

आंदोलन करण्याचा इशारा...
या मागण्या संदर्भाने वेळीच तत्काळ कारवाई व्हावी, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी व आयुक्त यांना दिलेल्या निवेदनावर राज्याचे रिपब्लिकन सेनेचे महासचिव कुमार कुर्तडीकर, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष भगवान कंधारे, नांदेड जिल्ह्याचे दक्षिण जिल्हाध्यक्ष नितिन बनसोडे, उत्तरचे साहेबराव चौदंते, युवा कार्यकर्ते किरण आठवले, मंगेश गोडबोले, अनिल वाठोरे, सुरज साळवे, विनायक अन्नपूर्णे, मारोती गायकवाड, गौतम पठणे, भैयासाहेब ढवळे, नरेंद्र आठवले, शिवराज सुर्यतळ, गोविंद आठवले, मयूर जोंधळे, अश्विनी सोनुले, शोभा खिल्लारे, मोहन लांडगे, विकास पक्काने, सविता बेभटे, पंडित ढवळे, राजरत्न गजभारे, गुरुचरण मस्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republican sena condemns racial attack on Nanded, Nanded news