निवृत्त तहसिलदाराची मालकीची जमीन मिळविण्यासाठी धडपड

साजीद खान
Tuesday, 13 October 2020

सेवानिवृत्त तहसिलदार पदावरून सेवानिवृत्त झाल्यापासून आजतागायत वडिलोपार्जित जमीन मिळविण्यासाठी धडपडत आहे.

वाई बाजार (नांदेड) : कुख्यात नक्षलवादी विजय कुमारचा एकेकाळी दरारा असलेला माहूर, किनवट तालुक्यातील मध्यभागी व तेलंगणा राज्याच्या सीमेजवळील सारखणी येथील आदिवासीयांची हस्तांतरण प्रतिबंध असलेली जमीन गैर आदिवासीयांनी संपत्तीच्या बळावर आणि भ्रष्ट महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने गिळंकृत केली. त्या भूखंडावर बेकायदेशीर ताबा करून आज संपूर्ण सारखणी फाट्यावर आलिशान कॉप्लेक्स, व्यापारी प्रतिष्ठाने व गडगंज निवासी इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. 

सेवानिवृत्त तहसीलदार सिताराम डोनीकर यांच्या वडिलांना हैदराबाद कुळ कायद्यानुसार मिळालेल्या कृषक शेत जमिनीवरील हक्क मिळवण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून सातत्याने तहसील, सहायक जिल्हाधिकारी कार्यालय किनवट, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबादचे उंबरठे झिजवत आहेत. त्यामुळे आता रस्त्यावर उतरून सत्याग्रह आंदोलन, उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणे याही उपर जर न्याय मिळालाच नाहीतर अखेर आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्धार सेवानिवृत्त तहसीलदार सिताराम रामजी डोनीकर यांनी केला आहे. 

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ३६ नुसार आदिवासींची जमीन गैर आदिवासींना घेता येत नाही. अतिक्रमण करता येत नाही. असे असतानासुद्धा सारखणी फाटा येथील जमीन भूमाफियांनी संपत्तीच्या जोरावर बळाचा वापर करून आदिवासींच्या जमिनी बळकावल्या आहेत. मौजे सारखणी येथील जमीन सेवानिवृत्त तहसीलदार सिताराम डोनीकर यांचे वडील रामजी महादु डोनीकर यांना हैदराबाद कुळ कायद्यानुसार मिळाली होती.

मिळालेली जमीन विक्री किंवा हस्तांतरण करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असतानासुद्धा यापूर्वी सारखणी परिसरातील भूमाफियांनी तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तहसीलदार यांच्या मदतीने बेकायदेशीरपणे आदिवासींची जमीन गैर आदिवासींच्या नावे करून दिली आहे. एकंदरीत या प्रकरणात किनवट व माहूर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी देखील वज्रमूठ बांधल्याने सारखणी आदिवासी भूखंडाचा ‘काऊंट डाऊन’ खऱ्या अर्थाने आत्ता सुरू झाला आहे. 

मालकीच्या जमिनीतून केले बेदखल

तहसीलदार पदावरून सेवानिवृत्त झाल्यापासून आजतागायत वडिलोपार्जित जमीन मिळविण्यासाठी धडपडत आहे. परंतु आर्थिक हितसंबंधात गुंतलेल्या व भ्रष्टाचाराने बरबटलेल्या नोकरशाहीने संपूर्ण नियम धाब्यावर बसवून माझ्या मालकीच्या जमिनीतून मलाच बेदखल केले. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो, आता एक तर माझा हक्क, माझी जमीन घेईन किंवा मग या टप्प्यावरच जीवन यात्रा संपवेल. 
- सिताराम डोनीकर, सेवानिवृत्त तहसीलदार, सारखणी. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired Tehsildar Sitaram Donikar of Wai Bazar struggles to get land