Nanded : इंधन दरवाढीमुळे मशागतही महागली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol diesel

इंधन दरवाढीमुळे मशागतही महागली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. शहरी भागात जसे नागरिकांना इंधन दरवाढीने मेटाकुटीला आणले आहे, तसे शेतकऱ्यांचीही चिंता वाढवली आहे. डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतीच्या खर्चात वाढ झाली आहे. मशागतीच्या खर्चात एकरी साधारणपणे २०० ते एक हजार रुपयांपर्यंत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शेतीचा वाढता खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने शेती सध्या तोट्यात जात आहे.

बदलत्या काळानुसार यांत्रिकीकरण आलं आणि शेतात बैलांची जागा ही हळूहळू ट्रॅक्टरने घेतली. ट्रॅक्टरमुळे शेतीच्या कामांनाही वेग आल्याने शेतीकरिता ट्रॅक्टर महत्त्वाचे साधन झाले आहे. शेतीमध्ये ट्रॅक्टरसोबत, रोटाव्हेटर, थ्रेशर यांचा वापर वाढला आहे. डिझेलची किंमत आता पेट्रोलच्या जवळपास येऊन ठेपली आहे. दोन्हीमध्ये थोडेच अंतर राहिले आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे शेतीची मशागत आता परवडणारी नसली तरी काळानुरून लाखांच्या घरात गेलेल्या बैलजोड्या ठेवणे सामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता इंधन दरवाढीचे संकट ओढवले आहे. या संकटामुळे शेतकरी पुन्हा एकदा मेटाकुटीस आला आहे.

एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे शेतकरी आता चिंतेत सापडला आहे. रब्बीच्या हंगामात सध्या शिवारात शेती मशागतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परंतू, शेतीची मशागतच करणे शेतकऱ्यांना महागात पडत असल्याने शेतकऱ्यांनी शेती करावी तरी कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या

गेल्या काही दशकांपासून शेती करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडून आला. आठ दिवसांची कामे ट्रॅक्टरद्वारे दोन दिवसात व्हायला लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचून मशागतीच्या कामांचा वेग वाढला. त्यामुळे उत्पन्नवाढीस मदत होत होती. परंतू, इंधन दरवाढीमुळे मशागत करणे परवडणारे नसून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

शासनाने शेतपीकाला हमीभाव द्यावा तसेच दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या इंधनदरवाढ थांबवावी. कारण, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे गणीत दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शेतकऱ्याचे जीवन उंचावण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी आवाज उठवायला हवा.

- नागनाथ शिंगणे, शेतकरी कुंटूर ता. नायगाव

loading image
go to top