पाण्यातून शोधावी लागते वाट

प्रभाकर लखपत्रेवार
Monday, 12 October 2020

लहान मोठे पुल बांधण्याचाही या कामात समावेश होता. पण सदरचे काम मागच्या तीन वर्षांपासून रखडल्याने दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम झाले नाही. याचा फटका कुष्णूर येथील शेतकरी व नागरिकांना बसत आहे. कुष्णूरच्या गावकुसाबाहेरुन एक छोटी नदी वाहते. दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता अनेक दिवस बंदच राहतो, तर नदीच्या पलीकडे शेती असलेल्या शेतकऱ्यांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. 
 

नायगाव, (जि. नांदेड) : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील गोदमगाव-आंचोली- हिप्परगा कृष्णूर-बरबडा हे २२ किमीचे काम तीन वर्षांपासून रखडले असून संबंधित कंत्राटदाराने पुलाचे काम केले नसल्याने कुष्णूर येथील शेतकरी व नागरिकांना कंबरे इतक्या पाण्यातून वाट शोधावी लागत आहे. त्यामुळे सदरचे काम लवकर पूर्ण करुन पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस दत्तात्रय पाटील जाधव यांनी पालकमंत्र्याकडे केली आहे. 

गोदमगाव-आंचोली-हिप्परगा-कृष्णूर-बरबडा हा रस्ता ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे काम मंजूर झाले. १० कोटी ४६ लाख रुपये खर्चाच्या २२ किमीच्या कामाचा (ता.११) सप्टेंबर २०१७ मध्ये शुभारंभ झाला. सदरचे काम १५ महिण्यात पुर्ण करण्याचा करार होता.

हेही वाचा -  नांदेड-मुंबई विशेष रेल्वेने ३६९ प्रवासी रवाना, पहिल्याच दिवशी शंभर टक्के प्रतिसाद
 

लहान मोठे पुल बांधण्याचाही या कामात समावेश होता. पण सदरचे काम मागच्या तीन वर्षांपासून रखडल्याने दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम झाले नाही. याचा फटका कुष्णूर येथील शेतकरी व नागरिकांना बसत आहे. कुष्णूरच्या गावकुसाबाहेरुन एक छोटी नदी वाहते. दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता अनेक दिवस बंदच राहतो, तर नदीच्या पलीकडे शेती असलेल्या शेतकऱ्यांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. संबंधित कंत्राटदाराने मागच्या तीन वर्षांत या पुलाचे काम केले नसल्याने या दिरंगाईचा फटका नागरिकांना व शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय पाटील जाधव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे एक निवेदन देवून रखडलेल्या कामाचा पाढा वाचला. 

कृष्णुर - हिप्परगा दरम्यानच्या पुलाचे काम झाले नसल्याने दोन्ही गावच्या नागरिकांना व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले व पुलाचे काम लवकर पूर्ण करुन उंची वाढवण्यात यावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे गोदमगाव-आंचोली- हिप्परगा-कृष्णूर-बरबडा हे काम पूर्ण करण्यासाठी १५ महिण्याचा कालावधी होता पण ३६ महिने झाले तरी काम अर्धवट अवस्थेत असताना या कामावर देखरेख व नियंत्रण ठेवणारे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे अधिकारी कुठलीच कारवाई करण्यास तयार नाहीत. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Road Has To Be Found Through The Water, Nanded News