esakal | नांदेडात भर दुपारी सराफा दुकानावर दरोडा, सराफा गंभीर, लाखोंचा ऐवज लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ही घटना बुधवारी (ता. २९) भरदुपारी घडल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळाला पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, अनंत नरुटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यांनी भेट दिली. 

नांदेडात भर दुपारी सराफा दुकानावर दरोडा, सराफा गंभीर, लाखोंचा ऐवज लंपास

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरातील दत्तनगर भागात असलेल्या एका सराफा दुकानावर अनोळखी हल्लेखोरांनी हल्ला करुन दुकानमालकास गंभीर जखमी केले. यानंतर दुकानातील सोन्या- चांदीचे दागिणे व ग्राहकाचे नगदी २५ हजार रुपये असा लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी (ता. २९) भरदुपारी घडल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळाला पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, अनंत नरुटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यांनी भेट दिली. 

अण्णाभाऊ साठे चौक परिसरात दत्तनगरमधील पोचम्मा मंदीरासमोर असलेल्या श्री. स्वामी समर्थ ज्वेलर्स हे नेहमीप्रामाणे दुकानमालक मुक्तेश्वर शहाने यांनी उघडले. ते आपल्या दुकानात ग्रहक करत असताना अचानक दुपारी एकच्या सुमारास एका विनानंबरच्या दुचाकीवरुन आलेल्या तीन हल्लेखोरांनी दुकानात प्रवेश केला. दुकानमालकास काही समजण्याच्या आतच त्यांनी शटर बंद करुन घेतले. खंजर दाखवून आरडाओरडा केला तर येथेच सर्वांना ठार करु अशी धमकी दिली. एवढेच नाही तर चक्क दुकानमालक यांच्या डोक्यावर खंजरने मारून त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर दुकानातील सोन्या-चांदीचे दागिणे व खरेदीसाठी आलेल्या एका ग्राहकाकडील नगदी २५ हजार रुपये असा लाखोंचा ऐवज घेऊन त्यांनी पोबारा केला. 

हेही वाचा - मोक्कातील आरोपीस अटक, पावणेदोन लाखाचे दागिने जप्त- द्वारकादास चिखलीकर

घटनास्थळाला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट

या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक अनंत नरुटे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठांना कळविले. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील हे आपल्या ताफ्यासह दाखल झाले. यावेळी पोलिसांच्या श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. दुकानासमोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले मात्र त्यांनी ( हल्लेखोर ) तोंडाला स्कार्फ बांधल्यामुळे ओळखण्यास अवघड जात आहेत. तरीसुद्धा पोलिस अधीक्षकांनी शहरात सर्वत्र नाकाबंदी लावली असून हे हल्लेखोर लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जखमी सराफा श्री. शहाने यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा सतत आपल्या कर्तव्यावर आहे. याचा फायदा हल्लेखोर, चोरटे घेत असल्याचे मागील काही घडलेल्या घटनांवरून दिसून येत आहे. शहर परिसरात जबरी चोरी, लुटमार, घरफोडी आदी घटनांत वाढ झाल्याने गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक संपला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहर व जिल्ह्यातील कायदा व्यवस्था बिघडत असल्याने व्यापारी, महिला आणि सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे.  या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी वेगवेगळ्या भागात पथके तैनात करण्यात आली आहेत. मुक्तेश्वर शहाणे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अनोळखी तीन हल्लेखोरांनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एकीकडे लॅाकडाऊनचा बाजारपेठेवर पडलेला गंभीर परिण आणि त्यातच अशी वाढती गुन्हेगारी नांदेडकरांना चक्रावून टाकणारी आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी सराफा असोसिएशनचे एक शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.