फेऱ्या ४४६१, उत्पन्न ३२ लाख तरीही उदिष्ट २२ टक्केच...

शिवचरण वावळे
Thursday, 4 June 2020

राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या बसेस जिल्ह्यांतर्गत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटी जिल्ह्याबाहेर जात नसली तरी जिल्ह्यांतर्गत सुरु असलेल्या बसेसच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

नांदेड : कोरोनामुळे एसटी महामंडळाला चांगलाच फटका बसला आहे. परंतु, या तोट्यातून सावरण्यासाठी एसटी महामंडळाची धडपड सुरु असून, जिल्ह्यांतर्गत सुरु असलेल्या बसेसला बारा दिवसाच्या कालावधीत ११ रुपये ९९ पैसे प्रति किलोमीटर याप्रमाणे लाखो रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. 

एसटी सेवा जिल्ह्यात (ता.२२) मे पासून सुरु झाली. परंतु पहिल्या दिवशी अनेक प्रवाशांना बस सुरु झाल्याचे माहिती नव्हते. शिवाय कोरोनामुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याने फारसे उत्पन्न मिळु शकले नव्हते. परंतु, हळुहळु एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत आहे. मागील बारा दिवसात नांदेडसह विभागातील भोकर, किनकट, माहूर, मुखेड, बिलोली, हदगाव, देगलुर, कंधार आगारातील ५१२ फेऱ्या मंजुर असताना देखील ४९० फेऱ्या सोडण्यात आल्या. 

हेही वाचा- महाविद्यालयातील कॅम्पसचे लूक बदलणार, कशासाठी? ते वाचा

भारमानाच्या तुलनेत उत्पन्न २१.९५ टक्केच

१२ दिवसाच्या कालावधीत विभागातून चार हजार ४६१ फेऱ्या प्रत्यक्ष चालविल्या गेल्या. २६ लाख आठ हजार ५४३ किलोमीटर प्रवास पूर्ण झाला आहे. यातून एसटी महामंडळास ११ रुपये ९९ पैसे प्रति किलोमीटर प्रमाणे ३२ लाख १९ हजार ७१६ रुपये इतके उत्पन्न मिळाले. जे की एकुण भारमानाच्या तुलनेत हे उत्पन्न केवळ २१.९५ टक्के इतके आहे.

हेही वाचा- लाॅकडाउनमध्ये जुळली दुरावलेली नाती, कशी? ते तुम्ही वाचाच

एसटी महामंडळाने असे दिले होते उदिष्ट्ये
आगार- नियते आणि फेऱ्या

-नांदेड- २२, १३२, भोकर- आठ - ५६, किनवट- पाच, १६, मुखेड-१४- ७८, देगलुर- नऊ-४८, कंधार- दहा-७४, हदगाव-पाच-३४, बिलोली- दहा- ६२, माहूर- तीन-१२ अशा ८६ नियते व ५१२ फेऱ्यांचे उद्दीट्ये ठेवण्यात आले होते. परंतु, अनेक स्थानकात प्रवाशी उपलब्ध नसल्याने बहुतेक आगारप्रमुखांनी घालुन दिलेल्या उदिष्ट्यापेक्षा कमी नियते व फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नात हवी तेवढी वाढ झाली नाही. 

महामंडळास दिलासा​
जिल्ह्यांतर्गत सुरु झालेली बस सेवा हळुहळु पूर्वपदावर येत आहे. प्रवाशी संख्येत वाढ होत आहे. बारा दिवसाच्या कालावधीत ८० हजार ५४४ प्रवाशांंनी बसने प्रवास केला असून, यातून नांदेड विभागास ३२ लाख १९ हजार ७१६ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. वाढत्या प्रवाशी संख्येमुळे महामंडळास दिलासा मिळत आहे. 
- संजय वाळवे, विभागीय वाहतूक अधिकारी, नांदेड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Round 4461 Income 32 Lakhs But The Target Is Only 22 Percent Nanded News