वाळू माफियांचा हैदोस खपवून घेणार नाही- पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे

गंगाधर डांगे
Monday, 7 September 2020

शंखतीर्थ येथील गोदापात्रात मुदखेड पोलीसांची कारवाई

 एक बोट सह दोनशे ब्रास वाळू साठा जप्त

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड तालुक्यातील शंख तिर्थ गोदावरीच्या वाळू पट्ट्यात वाळू माफियांकडून स्थानिक महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून दररोज भरमसाठ वाळू उपसा चालू असल्यामुळे वाळू माफियांचे मोठे फावले आहे. मात्र वाळू माफियांचा हैदोस खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी देऊन मोठी कारवाई केली.

शनिवारी (ता.पाच)  रोजी रात्री अकरा वाजता शंखतीर्थ ता. मुदखेड येथील गोदावरीच्या पात्रात बोटीच्या साहाय्याने रेती उपसा चालू असल्याची माहिती मुदखेड चे पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांना खबऱ्याकडून माहीती मिळाली असता पोलीस निरीक्षक निकाळजे, उपनिरिक्षक सुरेश भाले, रमेश खाडे, केशव पांचाळ यांच्या पथकाने रात्री एक वाजता शंखतीर्थ येथे जाऊन कारवाई केली या कारवाई दरम्यान वाळू उपसा करणारे वाळूमाफिया बोट चालक पसार झाले.

पोलिसांच्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले

यादरम्यान त्या ठिकाणी पोलिसांच्या पथकाला दोनशे ब्रास वाळू व एक बोट आढळून आली पोलिसांनी हे सर्व जप्त करून नुकतेच रुजु झालेले भोकर महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांना ही माहिती मिळताच ते देखील आज ता. ६ रोजी सकाळी आठ वाजताच शंखतिर्थ येथे घटना स्थळी पोहोचले व वाळु साठे, बोट, पाईप ची पाहणी करून पोलिस व मंडळ अधिकारी एम.ऐ. कुराडे, तलाठी प्रविण होंडे, रमेश गडाफोड यांच्या साह्याने पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे या वाळू साठ्यावर कारवाई केली व सदरील उपसा करत असलेली बोट जप्त करून तहसील कार्यालयात जप्त केली आहे दरम्यान पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांना याविषयी माहिती विचारली असता त्यांनी अंदाजे दोनशे ब्रास वाळू साठा असल्याचे सांगितले.

हेही वाचा  शालेय पुस्तके विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाला, काय आहे कारण?

तहसिल कार्यालयाचे पित्तळ उघडे

तर याच विषयी मंडळ अधिकारी एम.ऐ. कुराडे यांनी आज जप्त केलेली वाळु ८o ब्रास असल्याचे सांगितले दोघांनीही वेगवेगळे आकडे दिल्यामुळे महसूल प्रशासनावर संशयाची सुई येत आहे. दरम्यान मुदखेड पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई पाहण्यासाठी भोकर महसुलचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी भेट दिली परंतु मुदखेड महसूल मंडळाचा कारभार सांभाळणारे तहसीलदार दिनेश झांपल्ले हे मुख्यालयी असतानाही या वाळू पट्ट्यात वाळू माफियांकडून भरमसाठ वाळूचा उपसा होत असल्याबद्दल कुठलीही कारवाई केली नसल्याने व उपविभागीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी येऊन कारवाई करण्याची वेळ येते तेव्हा मुदखेड चे तहसीलदार दिनेश झांपले हे काय करतात? असा प्रश्नही गंगा बचाव समितीचे कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.

महसुल प्रशासनाला माहीती न होऊ देता कारवाई करण्याची ही दुसरी वेळ

मुदखेड तालुक्यातील वाळुपट्यात पोलिस व उपविभागीय अधिकाऱ्यांनी मुदखेड महसुल प्रशासनाला माहीती न होऊ देता कारवाई करण्याची ही दुसरी वेळ आहे या पुर्वी तत्कालीन उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी सायकलीवर या भागात फिरून वाळु साठ्यांवर कारवाई केली होती.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sand smugler will not be tolerated Police Inspector Sunil Nikalje nanded news