आपल्या कामाशी प्रामाणिकपणे राहिल्यास समाधान मिळते- न्यायाधीश धोळकीया

प्रल्हाद कांबळे
Thursday, 30 July 2020

तसेच आपण न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये असल्याने पिडीतांना न्याय देता आला पाहिजे, त्यासाठी आलेल्या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास असायला पाहिजे असे मत प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकीया यांनी व्यक्त केले.

नांदेड : आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना त्या कामाशी प्रामाणिकपणे राहिल्यास स्वतःसह व समाजालाही समाधान मिळते. तसेच आपण न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये असल्याने पिडीतांना न्याय देता आला पाहिजे, त्यासाठी आलेल्या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास असायला पाहिजे असे मत प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकीया यांनी व्यक्त केले.

जिल्हा सरकारी वकील अॅड. आशिष गोधमगावकर यांनी आपल्या कक्षामध्ये प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकीया यांना सेवानिवृत्तीचा निरोप देण्यासाठी गुरुवारी (ता. ३०) दुपारी दोन वाजता आयोजित केलेल्या व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारिरीक अंतर ठेवत छोटेखानी कार्यक्रमात न्यायाधीश धोळकीया बोलत होते. यावेळी अॅड. संजय लाटकर, अॅड. यादव तळेगावकर, अॅड. रणजित देशमुख आणि अॅड. मनीकुमारी डांगे (बतुला) यांची उपस्थिती होती.

हेही वाचा -  Good news: जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्के- जिल्हाधिकारी डाॅ. विपिन

न्यायाधीश धोळकीया यांच्याकडील तीन गुण ज्यात (वक्तृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व)

सर्वप्रथम अॅड. आशिष गोधमगावकर यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या कार्यकाळात आलेल्या विविध अनुभवाचे कथन केले. न्यायाधीश धोळकीया यांच्याकडून आयुष्यात खूप काही शिकायला मिळाले. त्यांनी घालून दिलेल्या नियमाचे पालन करत आम्ही पुढील कार्यकाळात काम करु असा विश्वास व्यक्त केला. न्यायाधीश धोळकीया यांच्याकडील तीन गुण ज्यात (वक्तृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व) या तिहेरी भूमिकेचे त्यांनी सविस्तर मांडणी केली. न्यायदानात काम करत असतानाही त्यांनी समाजाचेही हित जपले. सरळ मनाचा माणूस असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे न्यायाधीश धोळकीया वज्रापेक्षा कठीण आणि मेनापेक्षा मऊ असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा न्यायालयात काम करणाऱ्या सर्वच वकिलांना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. तर काम चुकार कर्मचाऱ्यांचे वेळप्रसंगी त्यांना समज देऊन कानही टोचले. 

आपल्या कामाशी प्रामाणिक राहिले पाहिजे 

यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की, राज्याच्या विविध तेरा जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली. शासनाच्या न्याय विभागाद्वारे न्यायदान करताना असे अनेक कठीण प्रकरणे समोर आले मात्र त्याचा सविस्तर अभ्यास करुन पिडीतांना न्याय देण्याचे समाधान वाटते. नोकरीनिमित्त अनेक भागातील मानवी स्वभाव जवळून अभ्यासता आला. आपल्या कामाशी प्रामाणिक राहिल्यास स्वतः आनंदित राहून समाजालाही न्याय देता येतो. या पवित्र भूमीत काम करताना सतरा महिने सहज निघून गेले. अनेक प्रकरणे निकाली काढता आली. अनेकांना न्याय दिला परंतु जे समाजकंटक आहेत त्यांना शिक्षाही दिली. या जिल्ह्यात भरपूर काम केले. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील न्यायालयाच्या इमारतींचे पुनर्जीवन करता आले. सुदैवानं या जिल्ह्यात सर्वांचे मला सहकार्य मिळाले.

येथे क्लिक करानांदेड : शासनाला दरमहा ४० कोटी महसुल देणारी कंपनी बंद...कशामुळे ते वाचा?

केलेल्या कामात मी नक्कीच आनंदी 

केलेल्या कामात मी नक्कीच आनंदी असल्याचे असे त्यांनी व्यक्त केले. आपण ज्या पदावर असतो त्यावेळी नक्कीच त्या पदाला न्याय देता आला पाहिजे. प्रत्येक प्रकरण रात्री उशिरापर्यंत पूर्ण वाचन करुन दुसऱ्या दिवशी निकाल देण्याची माझी सवय असून प्रत्येक प्रकरणाची नोंदणी माझ्या वैयक्तिक डायरीमध्ये वकिलाच्या नाव व तारखेसह लिहून ठेवण्याची माझी सवय माझ्या कामात मला चांगली ठरली. येणाऱ्या काळात आपणही समाजेचे काही देणे लागतो या भावणेतून सामाजिक कार्य करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे कोविड-१९ या बिकट काळात जिल्हा न्यायालयातील ९० वकिलांना धान्य किट वाटप करण्याचे पुण्याचे काम माझ्या हातून घडले. या कामाचे वरिष्ठ पातळीवर सुद्धा कौतुक झाल्याचे न्यायाधीश धोळकीया यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. यादव तळेगावकर यांनी केले. यावेळी संजय लाठकर आणि मनिकुमारी बतुला यांनीही आपले मत व्यक्त कले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satisfaction comes from being honest with your work Judge Dholakia nanded news