esakal | शनिवारी कोरोनाचे पुन्हा तीन रुग्ण वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या ४१७ इतकी झाली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ३०६ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ९३ रुग्णांवर उपचार सुरु

शनिवारी कोरोनाचे पुन्हा तीन रुग्ण वाढले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होईल असे वाटत असतानाच नांदेड जिल्ह्यातील गाव खेड्यात देखील कोरोनाचे रुग्ण नव्याने वाढत आहेत. शनिवारी (ता. चार) आलेल्या अहवालात पुन्हा तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली.
 
शुक्रवारी (ता. तीन) सायंकाळी ९० पेक्षा अधिक संशयित रुग्णांंचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. शनिवारी सकाळी यातील १४ स्वॅब अहवाल प्राप्त झाले आहेत. यात तीन जण बाधित असल्याचे उघड झाले आहे. नव्याने सापडलेले तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातील असून, यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. मुखेड तालुक्यातील दापका येथील ३२ वर्षीय पुरुष, गांधीनगर बिलोली येथील ७१ वर्षीय महिला व ३३ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
   
जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या ४१७ इतकी झाली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ३०६ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बाधीत १८ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

हेही वाचा- जिल्हाधिकाऱ्यांची दुचाकीवरुन सवारी, वाळू माफियांचे धाबे दणाणले ​

विविध ठिकाणी ९३ रुग्णावर उपचार सुरु

शुक्रवारी दिवसभरात १६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले. पंजाब भवन कोविड केअर सेंटरमधील सात आणि डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील एक असे आठ रुग्ण घरी सोडण्यात आले होते. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात २९, पंजाब भवन कोविड सेंटर ४६, मुखेड कोविड सेंटर एक, देगलुर कोविड सेंटर एक, हदगाव कोविड सेंटर एक, जिल्हा रुग्णालयात दोन या शिवाय औरंगाबाद येथे नऊ आणि सोलापूर येथे एक बाधीत रुग्ण संदर्भित करण्यात आला आहे. नव्याने आलेले तिन्ही रुग्ण त्याच तालुक्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर म्हणाले.

हेही वाचा- कोरोना ब्रेकिंग - नांदेडला कोरोनाचा अठरावा बळी ​

तज्ज्ञ डॉक्टर म्हणतात रुग्ण वाढण्याच्या शक्यता

पुढील काळात कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ डॉक्टर्सकडून वर्तविण्यात येत आहे. परंतु या बद्दल कुणीही उघडपणे बोलत नसले तरी, प्रत्येकानी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे.  घराबाहेर पडताना सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज याशिवाय खरेदीसाठी बाहेर पडल्यानंतर दोन व्यक्तींमध्ये समांतर अंतर राखणे गरजेचे आहे.  यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून देखील अफवावर विश्वास न ठेवता नागरीकांंनी खबरदारी घेऊनच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडु नये, असे आवाहन केले जात आहे.