नांदेड ः कंधारची ‘एसबीआय’ बनली दलालांचा अड्डा

हाफीज घडीवाला 
Tuesday, 10 November 2020

या बँकेत दलालांचा सुळसुळाट झाल्याच्या बातम्या सातत्याने माध्यमातून प्रकाशित होऊनही दलालांना पायबंद करण्यात आले नाही. विशेष म्हणजे वरीष्ठही याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे एसबीआय दलालांचा अड्डा बनल्याचे चित्र आहे.

कंधार ( नांदेड) : झोपलेल्यांना जागे करणे अवघड नसते, परंतु झोपेचे सोंग घेतलेल्याना जागे करणे मोठे जिकिराचे काम असते. काहीसे असेच चित्र सध्या कंधारमधील एसबीआयकडे पाहून म्हणावेसे वाटते. या बँकेत दलालांचा सुळसुळाट झाल्याच्या बातम्या सातत्याने माध्यमातून प्रकाशित होऊनही दलालांना पायबंद करण्यात आले नाही. विशेष म्हणजे वरीष्ठही याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे एसबीआय दलालांचा अड्डा बनल्याचे चित्र आहे. दलालांमुळे बँकेतील ग्राहक व शेतकऱ्यांची मात्र मोठ्याप्रमाणात हेळसांड होताना दिसत आहे. 

 हे ही वाचा : नांदेड : उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात एकच वैद्यकीय अधिकारी

शहरातील एसबीआय शाखेत सध्या दलालांचीच चलती असून येथे दलालांचे काम तात्काळ केले जाते, परंतु शेतकऱ्यांना व इतर खातेदारांना मात्र चकरा माराव्या लागतात. या बँकेत शेतकऱ्यासह पेन्शनर, नोकरदार, संजय गांधी निराधार योजना, व्यापारी आदी खातेदार आहेत. त्यामुळे येथे नेहमीच खातेदारांची तोबा गर्दी असते. खातेदारांशी उर्मट बोलणे, हाकलून लावणे खातेदारांचे समाधान न करता त्यांच्याशी हुजत घालणे, असे प्रकार येथे नेहमी घडत असल्याची चर्चा आहे. कोणाकडेही जा, तक्रार करा असा दमही येथील कर्मचारी देत असल्याचे कळते. यामुळे बँकेत कामानिमित्त जाण्यास सर्वसामान्याचा थरकाप उडत आहे.
 
हे ही वाचा : नांदेडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढण्यासाठी रितसर प्रस्ताव दिल्यानंतरही त्यास महीनो-महिने चकरा माराव्या लागतात. संबंधित अधिकाऱ्यांच्या मनात आलेच तर फाईल गहाळ झाल्याचे सांगून शेतकऱ्यांस दुसरी फाईल करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांस आर्थिक भुर्दंडासोबतच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांना चकरा मारावयास लावणारे अधिकारी दलालांमार्फत गेलेल्या फायली मात्र तात्काळ मंजूर करतात. यामुळे अनेक शेतकरी नाईलाजास्तव दलालाकडे जातात. कर्जाच्या फायलीच नाही तर बँकेतील अनेक शासकीय कामे देखील कर्मचाऱ्यामार्फत दलालच करीत असतात. 
 
टोकाचे पाऊल उचलावे लागणार काय?
 
दहा-बारा दिवसापूर्वी गोलेगाव येथील एका शेतकऱ्याने पीक कर्जासाठी बँकेच्या चकरा मारून-मारून वैतागून बँकेतच विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांना आपले काम करून घेण्यासाठी असेच टोकाचे पाऊल उचलावे लागणार काय? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ‘एसबीआय’ ही कंधारमधील एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे. यामुळेच येथील अधिकारी मनमानी करीत आहेत. हे रोखण्यासाठी शहरात दुसरी राष्ट्रीयकृत बँक आवश्यक आहे. याची दखल घेऊन आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी कंधारमध्ये आणखी एक राष्ट्रीयकृत बँकेसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At the SBI Bank branch in Kandahar, the work of brokers is done immediately