नांदेड जिल्ह्यातील शाळांची घंटा राहणार बंदच, एक डिसेंबरनंतर निर्णय

प्रमोद चौधरी
Sunday, 22 November 2020

जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा ३० नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. एक डिसेंबरनंतर कोविडची स्थिती लक्षात घेऊन शाळा सुरु करण्याचे ठरविण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी (ता.२२) कळविण्यात आले आहे.

नांदेड :  जिल्ह्यातील कोविडची स्थिती, त्यादृष्टीने शाळा सुरू करताना करावयाचे नियोजन आणि शिक्षकांच्या  ‘आरटी-पीसीआर’ चाचण्या, त्याचे निकाल येण्यासाठी लागणारा वेळ या बाबी लक्षात घेऊन जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा ३० नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. एक डिसेंबरनंतर कोविडची स्थिती लक्षात घेऊन शाळा सुरु करण्याचे ठरविण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी (ता.२२) कळविण्यात आले आहे. 

देशभरातील कोविड स्थितीमुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष शाळा सुरू करता आल्या नव्हत्या.  इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सोमवारी (ता.२३) सुरू करण्याचे प्रस्तावित होते. नांदेड जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्या ८५८ शाळा असून; त्यात जिल्हा परिषदेच्या ७० शाळा आहेत. इयत्ता नववी ते बारावीला शिकवणारे जिल्हा परिषद व खाजगी शाळांचे असे एकूण आठ हजार ११५ शिक्षक आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यासाठी नियोजन करण्यात आले. शिक्षकांचे नाव, त्यांची तपासणी तारीख व ठिकाण निश्चित करून अशा याद्या महानगरपालिका व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या होत्या.

हेही वाचा - बार्टीचे नवीन नियम अनुसूचित जाती संवर्गतील यूपीएससी मुख्य परीक्षार्थ्यांच्या मुळावर- दीपक कदम

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी  शाळारंभाची पूर्वतयारी यासंदर्भाने डायटचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थिती जाणून घेतली.  प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर आणि डायटचे प्राचार्य रवींद्र आंबेकर यांनी शाळा सुरू करण्याच्या पूर्वतयारीबाबत माहिती दिली. 

हे तर वाचलेच पाहिजे - नांदेड जिल्ह्यात पिकांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांना करावी लागतेय कसरत

ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेण्यासाठी तसेच जे शिक्षक  Antigen टेस्टमध्ये निगेटिव्ह आलेले आहेत किंवा त्यामधील सेन्टेन्स असूनही निगेटिव्ह आलेले आहेत अशा लोकांची आरटीपीसीआर टेस्टिंग करणे तसेच ज्यांची आरटीपीसीआर टेस्टिंग झालेली आहे  त्यांचे टेस्ट रिपोर्ट प्राप्त करणे यासाठी संपूर्ण तपासणीचा अहवाल येणे आवश्यक आहे.  ही बाब लक्षात घेऊन शाळा सुरू करणे बाबत दोन डिसेंबरपर्यंत निर्णय स्थानिक प्रशासनाकडून कळविण्यात येईल.

येथे क्लिक कराच - तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील मृत्यूदर स्थिर, शनिवारी ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; ३७ रुग्ण कोकोरोनामुक्त
 
४० टक्केच शिक्षकांची झाली तपासणी
दरम्यान जिल्ह्यातील दोन हजार २८२ शिक्षकांची एंटीजन टेस्ट करण्यात आली असून चार हजार ९८२ शिक्षकांची तपासणी करणे सुरू आहे. यापैकी ९२७ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. दोन हजार ७०२ जणांची चाचणी सुरू आहे. आतापर्यंत ४० टक्के शिक्षकांची तपासणी पूर्ण झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School Bells In The Nanded District Will Remain Closed Nanded News