नांदेडमध्ये बोगस सोयाबीन उत्पादक कंपनीवर दुसरा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

लोकप्रतिनिधीनी हा विषय लावून धरला. अखेर प्रशासनाने या तक्रारींची दखल घेत कृषी विभागाच्या फिर्यादीवरुन धर्माबाद पोलिस ठाण्यात मध्यप्रदेशच्या सारस कंपनीविरुद्ध शुक्रवारी (ता. चार) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : अगोदरच कर्जबाजारी शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज काढून आपल्या काळ्या आईची कुश भरण्यासाठी सोयाबीनचे बियाणे खरेदी केले. ते महागामोलाचे बियाणे आपल्या शेतात पेरले. मात्र पेरलेले बियाणे उगवले नाही. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी राज्यभर तिव्र संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधीनी हा विषय लावून धरला. अखेर प्रशासनाने या तक्रारींची दखल घेत कृषी विभागाच्या फिर्यादीवरुन धर्माबाद पोलिस ठाण्यात मध्यप्रदेशच्या सारस ॲग्रो कंपनीविरुद्ध शुक्रवारी (ता. चार) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठवाड्यातील वजिराबादनंतर हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याचे कृषी विभागाने सांगितले.

हेही वाचा - शनिवारी कोरोनाचे पुन्हा तीन रुग्ण वाढले

देशावर व संबंध जगावर सध्या कोरोनाचे महाभंयकर संकट सुरू आहे. या संकटामुळे सर्वच क्षेत्र डबघाईस आले आहे. या संकटात शेतकरीही सुटला नाही. शेतकऱ्यांच्या नशिबी नेहमी अठराविश्‍व दारित्र्य त्यांच्या पाचवीला पुंजलेले आहे. कधी आवर्षण तर कधी ओला दुष्काळ यमुळे मागील पाच वर्षापासून राज्यात शेतकरी आपल्या सुखी संसार उघड्यावर टाकून आत्महत्या करत आहे. या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असूनही निसर्गाच्या सपाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबत नाहीत.

हे देखील वाचाच - अर्जापूरच्या युवकाचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायीच, कसा? ते वाचलेच पाहिजे

शेतकरी पुन्हा खचुन गेला

यावर्षी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बियाणे उत्पादक कंपन्यांनी फटका दिला. महागामोलाचे बियाणे खरेदी करुन स्वत: कर्जात बुडून खरेदी केलेले सोयाबीनचे बियाणे आपल्या शेतात पेरले. सुरवातीला निसर्गाने साथ दिली. मात्र पेरलेले सोयाबीनचे बियाने उगवले नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा खचुन गेला आहे. बियाणे उगवन क्षमता चाचणी परभणी कृषी विद्यापीठात करण्यात आल्यानंतर हे बियाणे निकृष्ट व अप्रमाणीत घोषीत करण्यात आले.

मध्यप्रदेशातील खंडवा येथील कंपनी

मध्यप्रदेशमधील खांडवा येथे कार्यरत असलेल्या मे. सारस ॲग्रो इंडस्ट्रीज व क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र बापूसाजी गुलकरी (वय ५१) रा. यवतमाळ (महाराष्ट्र) यांच्याविरुद्ध धर्माबाद पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्‍वास गोपाळराव अर्धापूरे यांच्या फिर्यादीवरुन धर्माबाद पोलिस ठाण्यात फसवणुकीसह बियाने अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीचे व इगल कंपनीने उत्पादन केलेले सोयाबीनचे बियाणे राज्यभर आपल्या दुकानदारांमार्फत विक्री केले होते. जिल्हाधिकारी व संबंधीत कृषी अधिक्षक कार्यालयात शेतकऱ्यांच्या १३४२ तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी यात लक्ष घातले. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. उजगरे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second case filed against bogus soybean grower in Nanded