esakal | गंभीर - रामघाटावर अंत्यविधीला नांदेडकरांची ‘या’ कारणासाठी होतेय अडवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

गोदावरी नदीवरील रामघाट स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांची पैशासाठी अडवणूक केली जात आहे. कोणतीही पावती न देताच त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जात आहे. रात्री - अपरात्री स्मशानभूमीत आलेल्या नातेवाईकांच्या खिशात पैसे नसल्यास तासनतास ताटकळत बसावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन कार्यवाही करण्याची गरज व्यक्त होत आहे.

गंभीर - रामघाटावर अंत्यविधीला नांदेडकरांची ‘या’ कारणासाठी होतेय अडवणूक

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - शहरात रामघाट, तारातीर्थ घाट, नगीना घाट, गोवर्धन घाट, डंकीन परिसर, नावघाट, सिडको या ठिकाणी अंत्यविधीसाठीची स्वतंत्र व्यवस्था असली तरी सुविधांची वाणवाच आहे. गोवर्धन घाट ही शहरातील मुख्य स्मशानभूमी आहे. या ठिकाणी एकुण १२ पिंजरे (मसनजाळी) आहेत. त्यातील आठ ते नऊ पिंजरे हे कोरोना पॉझिटिव्हने मृत पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरण्यात येत आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी याच ठिकाणी केला जात असल्याने इतर नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नाइलाजाने गोवर्धन घाटापासून काही अंतरावर असलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जात आहेत. 

हेही वाचा - राहाटीचा (ता.नांदेड) लोकसेवक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ​

पिंजऱ्याची अवस्था खिळखिळी 

या ठिकाणी देखील गोदावरी नदीपात्राच्या शेजारी दोन पिंजरे तयार करण्यात आले आहेत. परंतू ते अपुरे पडत असल्याने मुख्य गेटच्या बाजूस असलेल्या रिकाम्या जागेत पत्राचे शेड उभारुन त्या ठिकाणी अंत्यविधासाठी जागा करण्यात आली आहे. या ठिकाणी केवळ एकच पिंजरा असून, त्याची अवस्था खिळखिळी झाली आहे. त्यामुळे नातेवाईकांना जमिनीवर मोकळ्या जागेत लाकडाचा पिंजरा तयार करुन त्या ठिकाणी अंत्यविधी उरकुन घ्यावा लागत आहे. 

पैशासाठी अडवणुक योग्य नाही 

कुठलीही सुविधा नसताना त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईकांकडून एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जात आहेत. मंगळवारी संध्याकाळी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने रामघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांकडून जागेचे भाडे म्हणून विनापावती एक हजार रुपये घेण्यात आले. संबंधित व्यक्तीकडे पुरेशे पैसे नसतानाही त्यांच्याकडून एक हजार रुपये घेतल्याचे हे प्रकरण लोकप्रतिनिधींच्या कानावर गेले. त्यांनी संबंधीत व्यक्तीची कानउघडणी केल्यानंतर त्यांचे हे पैसे परत करण्यात आले. मात्र, या ठिकाणी असे दररोज अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईकांसोबत असेच घडत असल्याने अनेकजण त्रस्त आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड - घरांची मागणी वाढण्याला लॉकडाउन कारणीभूत, कसे ते वाचा... ​

गोवर्धन घाटावर दिली जाते पावती 

दुसरीकडे गोवर्धन घाटावर अंत्यविधीसाठी आलेल्या मृत्य व्यक्तीच्या नातेवाईकांकडून शांतीधाम संघटनेच्या वतीने अंत्यविधीसाठी लागणारे लाकडे, साडी - धोतर, बांबु, सुतळी, तुप, खारिक, खोबरे, शीतपेटी, रॉकेल अशा आवश्‍यक त्या सर्व गोष्टींसाठी पैसे आकारले जात असले तरी, कशासाठी पैसे घेतले जात आहेत याचा सर्व तपशील पावतीत दिला जातो. 

महापालिकेने द्यावे लक्ष 

रामघाटावर येणाऱ्या नातेवाईकांना तिथे असलेल्या व्यक्तीकडून पैशासाठी अडवणूक होत असल्याचे अनुभवास सामोरे जावे लागत आहे. यात लोकप्रतिनिधी लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर महापालिकेने देखील याबाबत तत्काळ लक्ष ठेऊन कार्यवाही करण्यासोबतच उपाययोजनाही करण्याची गरज आहे. तसेच महापालिकेच्या वतीने कर्मचारी, कामगारांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांनी केली आहे. 
 

 
 

loading image
go to top