भोकरच्या दत्तगडावरील तलावाचे भाग्य उजळले

बाबूराव पाटील
Monday, 24 August 2020


शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ऐतिहासिक दत्तगड असून, माथ्यावर एक तलाव आहे. अशा गडाला शहराने वर्तुळाकार वसाहतीचा विळखा घातला आहे. दुर्लक्षित राहिलेल्या गडाचे सुशोभीकरणाचे काम सेवा समर्पण करीत आहे. नुकतीच तलावात ‘श्रीं’ची स्थापना करण्यात आली आहे. 

भोकर, (जि. नांदेड)ः शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ऐतिहासिक दत्तगड असून, माथ्यावर एक तलाव आहे. अशा गडाला शहराने वर्तुळाकार वसाहतीचा विळखा घातला आहे. दुर्लक्षित राहिलेल्या गडाचे सुशोभीकरणाचे काम सेवा समर्पण करीत आहे. नुकतीच तलावात ‘श्रीं’ची स्थापना करण्यात आली आहे. या पुढाकाराने तलावासोबतच गडाचे भाग्य उजळून निघाले आहे.
पंचक्रोशीत ऐतिहासिक पुरातनकालीन वास्तू उभारलेल्या आहेत. यामुळे भोकर तालुका हा ऐतिहासिक ठेवा म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

 

पश्चिमेला सीताखंडी परिसर
शहराच्या पश्चिमेला सीताखंडी परिसर असून तिथे सीतेचे काही काळ वास्तव्य होते. त्यावेळी सीता विश्रांती घेत असताना उशाला आणि पायापाशी एक पाण्याचं पात्र होतं. झोपेत या पात्राला धक्का बसला आणि पाणी सांडलं. त्याच ठिकाणाहून एक सीतानदी, तर दुसरीकडे सुधा नदीचा उगम झाला आहे. अशी आख्यायिका आहे. तालुक्यात दोन्ही नद्या आज अस्तित्वात आहेत हे मात्र खरे आहे. शहराच्या पूर्व दिशेला पुरातनकाळातील मंदिर आहे, तर याच दिशेला महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवर पाळज (ता. भोकर) येथे जागृत गणपती मंदिर आहे. या दोन्ही ठिकाणी शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.

 

हेही वाचा -  नांदेडला सोमवारी ११८ पॉझिटिव्ह; दिवसभरात ११३ कोरोना मुक्त, पाच रुग्णांचा मृत्यू

 

शहरात हेमाडपंती मंदिर

दक्षिणेला कळवातणीचा महाल आणि शहरात हेमाडपंती मंदिर आहे. असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहराला पूर्वी ‘भोगावती’ शहर म्हणून संबोधिले जात असे. आज तेच शहर भोकर या नावाने प्रसिद्ध आहे. याशिवाय शहराचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे मध्यभागी ऐतिहासिक दत्तगड असून, तिथे एक तलावसुद्धा आहे. या गडाला चारही बाजूंनी शहरानी विळखा घातला आहे. याच गडावरून माहूर तीर्थक्षेत्राला भुयारी मार्ग असल्याची आख्यायिका आहे. गडावर रस्ता खोदकाम करताना भुयाराच्या काही खुणा सापडल्या आहेत. ऐतिहासिक दगडी शिळा आहेत. याच ठिकाणी असलेल्या तलावात अनेक वर्षांपासून गणेश विसर्जन केले जाते. अशा ऐतिहासिक गडावर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पूर्वी प्रयत्न झाले होते; पण कुठे माशी शिंकली कळायला मार्ग नाही. तेव्हापासून हा गड दुर्लक्षित राहिला होता.

तलावात मध्यस्थानी सुबक अशी गणेशमूर्तीची स्थापना कोलंबी संस्थानचे महंत यदूबन महाराज, भोकर गडाचे उत्तम महाराज यांच्या हस्ते मागील शनिवारी (ता.२२) केली आहे. यासाठी संस्थेचे राजेश्वर रेड्डी लोकावाड, बालाजी तुमवाड, विठ्ठल फुलारी, रवी देशमुख, प्रा. उत्तम जाधव, माधव जाधव वडगावकर, नारायण कुमरे, पांडुरंग माने, प्रकाश कदम, गंगाधर तमलवाड, अशोकरेड्डी किनीकर, किशोर नरवाडे, अमोल देशमुख, बालाजी काळवणे यांनी परिश्रम घेतले आहेत.

‘सेवा समर्पण’ने घेतला पुढाकार
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात परमार्थाचा हल्ली विसर पडल्याचे दिसून येत आहे. यात काही बोटावर मोजण्याइतके मंडळी मात्र आपण समाजाचं काही देणं लागतो म्हणून तन-मन-धनाने अर्धी ओंजळ रीती कशाला ठेवायची म्हणून विधायक सामाजिक उपक्रमात स्वतःला झोकून दिले आहे. भोकर शहरात अशीच एक सामाजिक संस्था ‘सेवा समर्पण’ या नावाने कार्यरत झाली आहे. अनेक ठिकाणी स्वयंस्फूर्तीने ही संस्था धावून जात आहे. येथील दत्तगडावरही त्यांनी सुशोभीकरण करून तलावातील गाळ, खडक फोडून विस्तारीकरण केले आहे. जवळपास दोनशे झाडे लावून संवर्धन केले आहे.

संपादन - स्वप्निल गायकवाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seva Is Dedicating The Work Of Beautification Of The Fort, Nanded News