भाच्याचा मृत्यू सहन झाला नसल्याने शंकर- पार्वती देवाघरी, कुठे ते वाचा...?

प्रल्हाद कांबळे
Monday, 7 September 2020

पती- पत्नी पैकी कोणाचातरी पहिले स्वर्गवास होतो. आणि जीवनाची साथ- संगत संपुष्टात येते. परंतु सत्य प्रेम असलेले पती- पत्नी आजही अनेक ठिकाणी आढळतात. हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथे पती शंकर यांचे निधन झाल्यानंतर काही तासातच पार्वती नामक पत्नीनेही प्राण सोडले.

नांदेड : मानवी संस्कारात लग्नाचे सात फेरे मारताना पती- पत्नी जन्मोजन्मी अशीच साथ राहू दे अशी प्रार्थना करतात. मात्र नियतीचा खेळ वेगळाच असतो. पती- पत्नी पैकी कोणाचातरी पहिले स्वर्गवास होतो. आणि जीवनाची साथ- संगत संपुष्टात येते. परंतु सत्य प्रेम असलेले पती- पत्नी आजही अनेक ठिकाणी आढळतात. हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथे पती शंकर यांचे निधन झाल्यानंतर काही तासातच पार्वती नामक पत्नीनेही प्राण सोडले. दोघांनाही एकाच चितेवर भडाग्नी देण्यात आली.

हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथील केंद्रीय राखीव पोलीस दलात अधिकारी असलेले पोचिराम सूद्देवाड यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे पार्थिव काश्मीरमधून गावी आणून ता. तीन सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थीवार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील अनेक नागरिक, नातेवाईक उपस्थित होते. आपला भाचा आपल्या अगोदर गेल्याचे दुःख त्यांचे मामा शंकर महादु उपलवाड (वय ८०) यांना सहन झाला नाही. त्यांनी भाच्या पाठोपाठ ता. चार सप्टेंबर रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

हेही वाचावाळू माफियांचा हैदोस खपवून घेणार नाही- पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे
अनेकांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली

त्यांच्यावर ता. पाच सप्टेंबर रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. परंतु पती गेल्याचे दुःख दिवंगत शंकर यांची पत्नी पार्वती उपलवाड (वय ७५) यांनाही सहन झाली नाही. ता. पाच सप्टेंबर रोजी सकाळी दिवंगत शंकरच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच पार्वतीने प्राण सोडले. काही तासातच पती पाठोपाठ पत्नीचे निधन झाल्याची वार्ता कळताच मंगरूळ गावावर शोककळा पसरली. भाच्या पाठोपाठ मामा- मामीने जगाचा निरोप घेतला. अनेकांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. स्वर्गीय शंकर व स्वर्गीय पार्वती या दांपत्याला दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

शंकर व पार्वती यांनी एकमेकांना कधीही अंतर दिले नाही

साठ वर्षांच्या संसारात शंकर व पार्वती यांनी एकमेकांना दिलेली साथ अखेरपर्यंत निभावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. शंकर व पार्वती यांच्यावर ता. पाच सप्टेंबर रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांची मने हेलावून गेली. शंकर व पार्वती यांनी एकमेकांना कधीही अंतर दिले नाही. कोणत्याही कार्यक्रमाला ते एकत्र जात असत असे त्यांचे सच्चे प्रेम या घटनेतून दिसून आल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shankar-Parvati Devaghari as his nephew's death was not tolerated nanded news