esakal | कुशल कारागिरांचे तंत्रज्ञ बनण्याचे स्वप्न भंगले; काय आहेत कारणे ?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आज सुतार, कुंभार, लोहार आदी समाजातील युवकांना कौशल्य असूनही आर्थिक अडचणीमुळे शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करता येणे अशक्य आहे

कुशल कारागिरांचे तंत्रज्ञ बनण्याचे स्वप्न भंगले; काय आहेत कारणे ?

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः सद्यस्थितीत पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यामध्ये अडचणीत सापडला आहे. अंगामध्ये कौशल्य असूनही सुतार, कुंभार, लोहार समाजातील अलिकडच्या पिढीला पारंपारिक व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय करण्याची वेळ आली आहे.


आज सुतार, कुंभार, लोहार आदी समाजातील युवकांना कौशल्य असूनही आर्थिक अडचणीमुळे शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करता येणे अशक्य आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ‘आर्टिझन टू टेक्‍नोक्रॅट’ ही योजना काही वर्षांआधी सुरू केली. या माध्यमातून कारागिरांना तंत्रज्ञ करण्याचा हेतू होता. मात्र, या हेतूला जनजागृतीअभावी हरताळ फासला गेल्याने ही योजना थंडबस्त्यात पडून आहे.


विविध उद्योगधंदे, कारखान्यांत काम करणारे कामगार किंवा व्यक्तिगत काम करणारे कारागीर अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असतात. मात्र, आपल्या व्यवसायातील कामात ते अतिशय कुशल असतात. त्यात प्रामुख्याने छोट्या-मोठ्या वर्कशॉपमध्ये काम करणारे टर्नर, मशिनिष्ट, गॅरेजमध्ये काम करणारे मेकॅनिक, सुतार, प्लंबर, बांधकाम कारागीर यांचा समावेश आहे. या कारागिरांकडे कुशलतेबाबतचे कोणतेही प्रमाणपत्र नसते. कौशल्य असूनही त्यांना अनेकदा कामे उपलब्ध होण्यास अडचणी येतात. पर्यायाने त्यांना पाहिजे तसे पैसे मिळत नाहीत. त्यांच्या उपजत कलागुणांना थोड्या प्रमाणावर प्रशिक्षणाद्वारे उजाळा देऊन त्यांच्या आवडत्या व्यवसायात, कौशल्यास पारंगत करण्याच्या उद्देशाने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने १२ एप्रिल २००५ रोजी ‘आर्टिझन टू टेक्‍नोक्रॅट’ ही योजना सुरू केली. यातून कौशल्य असलेले पण पैशांअभावी शिक्षण पूर्ण करता न येऊ शकलेल्यांना एक चांगली संधी विभागाने उपलब्ध करून दिली. एका चांगल्या आणि रोजगारभिमूख योजनेबाबत जनजागृतीची गरज होती. सुरवातीला थोड्याबहुत प्रमाणावर योजनेचा गाजावाजा करण्यात आला. मात्र, नंतर योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आले.

जनजागृतीअभावी योजना दुर्लक्षित  

या योजनेअंतर्गत प्रथमस्तरावरील आर्टिझनला टप्प्याटप्प्याने सिनिअर आर्टीझन, क्रॉफ्टसमॅन, मास्टर क्रॉफ्टमॅन, तंत्रज्ञ आणि शेवटी विशेष तज्ज्ञ बनण्याची संधी विभागाने उपलब्ध करून दिली होती. कारागिरांसाठी वय, शिक्षणाची अट नसलेली ही प्रशिक्षण योजना होती. यात कारागिराला अधिकच कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या लोकसेवा केंद्रात अल्पमुदतीचे प्रशिक्षण देण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. हे प्रशिक्षण केलेल्यांना कौशल्यस्तराचे मान्यप्राप्त प्रमाणपत्र, संबंधित व्यवसायातील उच्चस्तरावरील कौशल्य प्राप्त करण्याची संधी, औद्योगिक आस्थापनांचा सहभाग असल्याने प्रमाणपत्र धारकांना कारखान्यात प्राधान्य, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी मिळणार होत्या. मात्र, जनजागृतीअभावी ही योजना दुर्लक्षितच राहिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image
go to top