नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचा बोलबाला, ३०० ग्रामपंचायतीवर भगवा

file photo
file photo

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील तिनशेहून अधिक ग्रामपंचायतीत शिवसेनेने वर्चस्व निर्माण केले असून, या सर्व ग्रामपंचायतीवर शिवसेनेचेच सरपंच निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंढे, आनंदराव पाटील बोंढारकर यांनी व्यक्त केला आहे.

ता. १५ जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी ता. १८ जानेवारी रोजी पूर्ण झाली. एकंदर सर्व निकाल हाती आल्यानंतर जिल्ह्यातील तिनशे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. अन्य काही ठिकाणी महाविकास आघाडीसोबत युती झाली होती. त्याठिकाणीही शिवसेनेने आपला वरचष्मा सिध्द केला आहे. या निवडणुकीत जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी नांदेडला येवून बैठका घेतल्या. पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या असलेल्या समस्या तसेच गावपातळीवरचे नियोजन याबद्दल आखणी केली. 

शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार सुभाष साबणे यांनीही याबाबतचे नियोजन व्यवस्थित करुन तालुका पातळीवर शिवसेनेच्या प्रचाराची आखणी केली. स्थानिक पातळ्यावर जनतेशी चर्चा करुन शिवसेनेने आपले स्वतंत्र पॅनल उभे केले होते. त्यात तिनशेहून अधिक ग्रामपंचायतीवर शिवसेनेने आपला भगवा फडकवला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीत या सर्व ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच दिसतील, असा विश्वास जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंढे, आनंदराव पाटील बोंढारकर यांनी व्यक्त केला आहे. 

ग्रामपातळीवर शिवसेनेचे वर्चस्व आजही कायम असून, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजही खेड्यापाड्यातील शिवसैनिक मोठ्या हिमतीने व मेहनतीने शिवसेनेच्या बाजूने असल्याचा हा जबरदस्त पुरावा आहे. शिवसेनेची नाळ आजही ग्रामीण भागाशी जुळलेली असून, त्याचा प्रत्यय या निवडणुकीत कडवट शिवसैनिकांनी दाखवून दिला आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीची युती झाली होती. त्याठिकाणी देखील आम्ही आमचा सरपंच देण्याचा प्रयत्न करत आहोत, ग्रामीण भागात शिवसेनेचे असलेले जाळे तसेच कट्टर शिवसैनिकांनी केलेला प्रचार या माध्यमातून हे यश आम्ही संपादन केले आहे. लोकप्रतिनिधींनी दिलेली साथ आणि शिवसैनिकांनी केलेली मेहनत प्रशंसनीय असून, तिनशेहून अधिक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचेच सरपंच निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com