esakal | नांदेडला धक्का, दिवसभरात नऊ कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

नांदेडला कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून शनिवारी (ता. चार) दिवसभरात नऊ रुग्ण आढळून आले आहेत. आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२३ वर जाऊन पोहचली आहे. त्यातील ३१० उपचारातून कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून ९५ जणांवर उपचार सुरु आहेत.

नांदेडला धक्का, दिवसभरात नऊ कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड - शुक्रवारी तपासणीसाठी घेण्यात आलेल्या ९३ स्वॅब अहवालापैकी शनिवारी (ता. चार) सकाळी तीन व सायंकाळी सहा असे दिवसभरात नऊ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली.

शुक्रवारी (ता. तीन) सायंकाळी ९३ संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. शनिवारी सकाळी १४ व सायंकाळी ७९ स्वॅब अहवाल प्राप्त झाले आहेत. सकाळच्या अहवालात तीन, सायंकाळी सहा जण बाधित असल्याचे डॉ. भोसीकर यांनी माहिती दिली.

बाधीत रुग्णांची संख्या ४२३

दिवसभरात आढळून आलेल्या बाधितापैकी तीन महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यात मुखेड तालुक्यातील दापका येथील एक पुरुष(वय ३२), गांधीनगर बिलोली येथील एक महिला (वय ७१) व पुरुष (वय ३३), गणेशनगर (वय ६३), देगलूर (वय ५७), आंबेडकरनगर (वय ५०), अशोकनगर (वय ५४), विष्णुपुरी (वय ३१), देगलूर (वय ५७), अहमदपूर (रा. अंधोरी) (वय ४९) या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या ४२३ इतकी झाली. शनिवारी सायंकाळपर्यंत ३१० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बाधीत १८ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा-नांदेड महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे लागले लक्ष

विविध ठिकाणी ९५ रुग्णांवर उपचार सुरु

शनिवारी दिवसभरात नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. पंजाब भवन कोविड केअर सेंटरमधील चार रुग्ण घरी सोडण्यात आले होते. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात ३१ रुग्ण, पंजाब भवन कोविड सेंटरला ४३, मुखेड कोविड सेंटरला दोन, देगलुर कोविड सेंटरला एक, हदगाव कोविड सेंटरला एक, जिल्हा रुग्णालयात तीन, बिलोली कोविड सेंटरला दोन आणि एक रुग्ण नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या शिवाय औरंगाबाद येथे नऊ आणि सोलापूर येथे एक बाधीत रुग्ण संदर्भित करण्यात आला आहे. नव्याने आलेले तिन्ही रुग्ण त्याच तालुक्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी सांगितले.

हेही वाचा- मातृत्व वंदना योजनेचा ४५ हजार महिलांना लाभ

रुग्ण वाढण्याची वर्तवली शक्यता

पुढील काळात कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ डॉक्टर्सकडून वर्तविण्यात येत आहे. परंतु या बद्दल कुणीही उघडपणे बोलत नसले तरी, प्रत्येकानी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे. घराबाहेर पडताना सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज याशिवाय खरेदीसाठी बाहेर पडल्यानंतर दोन व्यक्तींमध्ये समांतर अंतर राखणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून देखील अफवावर विश्वास न ठेवता नागरीकांनी खबरदारी घेऊनच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

कोरोनाची संक्षिप्त माहिती
- दिवसभरात - नऊ रुग्ण पॉझिटिव्ह
- रुग्णसंख्या -४२३
- बरे झालेले रुग्ण-३१०
- उपचार सुरु- ९५
- मृत्यू- १८