धक्कादायक : नांदेड परिसरात १४ गोवंश मृतावस्थेत आढळले, सर्वत्र संताप

प्रल्हाद कांबळे
Monday, 29 June 2020

गोवंश वाहतुकीदरम्यान मृत झाल्याने त्यांचे मृतदेह मारतळा शिवारात रस्त्याच्या कडेला अज्ञातानी फेकून दिल्याचा प्रकार सोमवारी (ता. २९) सकाळी उघडकीस आला

नांदेड : राज्यात गोवंश हत्या कायदा असतानाही काही मंडळी चोरीच्या मार्गाने गोवंशांची ने-आण करतात. नांदेड शहराच्या विविध भागात अनधीकृत कत्तलखाने उभे करुन गोवंशाची बिनबोभाटपणे कत्तल केल्या जाते. असेच कत्तलीसाठी आणलेले गोवंश वाहतुकीदरम्यान मृत झाल्याने त्यांचे मृतदेह मारतळा शिवारात रस्त्याच्या कडेला अज्ञातानी फेकून दिल्याचा प्रकार सोमवारी (ता. २९) सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे सर्वत्र संताप पसरला असून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात व शहरात गोवंश हत्या बंदी कायदा असतानाही सर्रास गोवंशांची कत्तल होत असते. यापूर्वी पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई करून जीवंत गोवंश व कत्तल केलेले गोवंशचे मांस जप्त करून आरोपींना अटक केले. रात्री वाहनाद्वारे ग्रामिण भागातून ही जनावरे बहुतेक चोरी करून किंवा खरेदी करून कत्तलीसाठी आणण्यात येतात. राज्यातील सर्वाधीक गुन्हे नांदेड जिल्ह्यात कायदा अमलात आला तेंव्हापासून दाखल झाले आहेत. 

हेही वाचाशेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : अखेर ‘त्या’ सोयाबीन उत्पादक कंपनीवर नांदेडात गुन्हा दाखल  

‘या’ भागात होतात अनधीकृत कत्तली

शहराच्या देगलूर नाका, पिरबूऱ्हाननगर, निझामकॉलनी, करबला रोड, खुबा मशीद परिसर, हैदरबाग परिसर, मॅफ्को, इतवारा, आसरानगर, खडकपूरा, वाघी रोड परिसरात गोवंशाची अवैधरित्या कत्तल केल्या जाते. गोवंश वाहतुक करणारे टेम्पो, ट्रक, ॲपे ॲटो पोलिसानी जप्त केलेले आहेत. जप्त गोवंश हे गोशाळेत पाठविण्यात येतात. मात्र सोमवारी सकाळी हातनी व मारतळा शिवारात मृत गोवंश (गायी) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

उस्माननगर पोलिसांच्या हद्दीतील घटना

घटनेची माहिती नागरिकांनी उस्माननगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृत असलेल्या गोवंशाची त्यांनी दफन करून विल्हेवाट लावली. ही जनावरे मध्यप्रदेश राज्यातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नांदेड किंवा हैद्राबादकडे कत्तलीसाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. जवळपास १४ गोवंश रस्त्याच्या कडेला फेकून देऊन वाहनचालक पसार झाला आहे. मात्र या प्रकरणी हे वृत्त लिहीपर्यत उस्माननगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला नव्हता. 

येथे क्लिक करामुदखेड पंचायत समितीच्या माजी सभापतींची आत्महत्या

पोलिस प्रशासन जबाबदार

जिल्ह्याच्या सिमेवर तपासणी नाका असतांना अन्य वाहनांना अडवून त्यांची कसुन चौकशी केल्या जाते. मात्र गोवंशाची वाहतुक करणारे वाहने न तपासता त्या ठिकाणाहून सोडली जातात. तेथील पोलिसांना किंवा संबंधीत ठाणेदारांना हाताशी धरुन गोवंशाची कत्तल करणारे वाहतुक करतात. यापूर्वी उस्मानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अनेक गोवंश चोरीला गेले. त्याचा गुन्हा दाखल करण्याचे सौजन्य पोलिस दाखवू शकले नाही. ही चिंतेची बाब असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालावे अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हा मंत्री शशिकांत पाटील यांनी केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: 14 cows found dead in Nanded area, rage everywhere nanded news