धक्कादायक : विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 10 September 2020

कर्जबाजारी शेतकऱ्याने शेताजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.नऊ) सकाळी उघडकीस आली. गंगाधर गणपती कानगुले (वय ४५) असे त्यांचे नाव असून त्यांची दोन एकर कोरडवाहू शेती आहे.

मारतळा (जिल्हा नांदेड) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सुगाव (ता. लोहा) येथे घडली. या कर्जबाजारी शेतकऱ्याने शेताजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.नऊ) सकाळी उघडकीस आली.

गंगाधर गणपती कानगुले (वय ४५) असे त्यांचे नाव असून त्यांची दोन एकर कोरडवाहू शेती आहे. सततची नापिकी, कर्जाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. उस्माननगर पोलिसांत घटनेची नोंद झाली. कानगुले यांच्यामागे आई- वडील, पत्नी, तीन विवाहित मुली, मुलगा असा परिवार आहे.

हेही वाचा -  संगणक साक्षरते अभावी ऑनलाइन शिक्षणात सत्तर टक्के विद्यार्थ्यांना अडथळा

दोन दुचाकीची धडक, दोन गंभीर जखमी

नांदेड : आसना नदी पुल पॉईन्टकडून तरोडाकडे जाणाऱ्‍या मधल्या रस्त्यावर दोन दुचाकीची समोरा- समोर धडक झाल्याची घटना बुधवारी (ता. नऊ) सायंकाळी कालभैरव धाब्याजवळ घडली. या घटनेत दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले असून या जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. 

सहशिक्षक अनिल देवसरकर गंभीर

याबाबत माहिती अशी की जवळा पांचाळ- डोंगरकडा येथुन असना नदीपुल पॉईंट ते तरोडा जाणाऱ्या मधल्या मार्गावरून जवळा पांचाळ येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक अनिल अंकुश देवसरकर हे (एमएच-३८ एस.२५०८) या दुचाकीवरून घरी जात असताना समोरून येणाऱ्या (एपी२३ एच.४१९१) या दुचाकीची कालभैरव धाब्याजवळच धडक झाली. या अपघातात दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून यापेकी शिक्षक अनिल अंकुश देवसरकर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसऱ्याच्या पायाला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल लांडगे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन जखमीना रुग्मालयात पाठविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: Farmer commits suicide by jumping into a well nanded news