धक्कादायक : शांतीधाम पाण्याखाली गेल्याने रस्त्यावरच अंत्यविधी

प्रल्हाद कांबळे
Monday, 21 September 2020

गोदावरीच्या पसरणाऱ्या पाण्याने शांतीधामला वेढा घातला आहे. यामुळे अंत्यसंस्काराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अलीकडे मयत कोरोना रुग्णांचे अंत्यविधी शांतीधाम येथे केले जात असले तरी आता त्यांच्यावर अन्य ठिकाणी अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत

नांदेड : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस, विष्णुपुरीसह वरच्या धरणातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. गोदावरीच्या पसरणाऱ्या पाण्याने शांतीधामला वेढा घातला आहे. यामुळे अंत्यसंस्काराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अलीकडे मयत कोरोना रुग्णांचे अंत्यविधी शांतीधाम येथे केले जात असले तरी आता त्यांच्यावर अन्य ठिकाणी अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. अशा अवस्थेत कोरोना बाधित मृत व्यक्तीवर अंत्यविधी करण्यात आणखी अडचणी येणार असल्याचे दिसते. दरम्यान शांतीधाममध्ये पाणी आल्यानंतर एका मयत व्यक्तीवर बाहेर रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे विदारक चित्र नांदेड शहरात पहावयास मिळाले. 

शहराच्या मध्यवर्ती भागात आणि गोदावरी नदीच्या काठावर गोवर्धन घाट येथे शांतीधाम ही मोठी सार्वजनीक स्मशानभूमी आहे. या ठिकाणी एकाच वेळी सुमारे दहा ते बारा अंत्यविधी करण्यासाठी दहा ते बारा पिंजरे तयार करण्यात आले आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या अंत्यविधीसाठी शांतीधाम येथे सात ते आठ पिंजरे राखून ठेवण्यात आले होते. 

हेही वाचाहिंगोली : पूल नसल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांना काढावी लागते पाण्यातून वाट

किनारा ओलांडून गोदावरीचे पाणी शांतीधामच्या परिसरात 

नांदेडात गेल्या आठ दिवसापासून रोज जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे गोदावरी नदीचा जलस्तर रोज वाढत आहे. धरणातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. इतकेच नव्हे तर किनारा ओलांडून गोदावरीचे पाणी शांतीधामच्या परिसरात घुसले आहे. त्यामुळे या ठिकाणी अंत्यविधी करणे देखिल कठीण झाले आहे. या ठिकाणी आतापर्यंत कोरोनामुळे मयत झालेल्यांवर अंत्यविधी केले जात होते.

मृत्यूनंतरही वेटींगवर रहावे लागत आहे

पण आता पाऊस आणि पुराच्या परिस्थितीमुळे अशा व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी मोठा पेच निर्माण झाला आहे. आता सिडको येथील स्मशानभूमीत अंत्यविधीची सुविधा करण्यात आल्याचे सांगण्यात येते. अन्य व्यक्तींच्या अंत्यविधीची एक वेळ ठीक आहे पण कोरोना आजाराने मृत्यू झालेल्यावर अंत्यविधी कशी करावी हा मोठा पेट प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. कोरोनाची तपासणी करण्यासाठी वेटींगवर राहावे लागत असून आता तर मृत्यूनंतरही वेटींगवर रहावे लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: Funeral on the road after Shantidham went under water nanded news