
कोरोना बाधित रुग्णांसोबतच मृत्यूंचीही संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासह नांदेडकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
नांदेड : बळीरामपूर येथील ६० वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा मंगळवारी (ता.सात जुलै) दुपारी मृत्यू झाला. इतवारा चौक बाजार येथील ८३ वर्षीय वृद्धाचा मंगळवारी (ता.सात जुलै) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मृत्यू झाला होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
बळीरामपूर येथील ६० वर्षीय व्यक्ती त्रास जाणवू लागल्याने रविवारी उपचारासाठी दवाख्यानमध्ये दाखल झाला होता. दरम्यान त्याचा स्वॅब तपासणी पाठविला असता, सोमवारी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, सदर व्यक्ती ही गंभीर आजाराने अगोदरच त्रस्त असल्याने उपचाराला त्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान कोरोना बाधित रुग्णांसोबतच मृत्यूंचीही संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासह नांदेडकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
हेही वाचा - नांदेडच्या आमदारांची कुटुंबियांसह कोरोनावर मात...
सोमवारी (ता. सहा) दिवसभरात जिल्हा प्रशासनाकडून सकाळी नऊ, सायंकाळी पाच, रात्री सात व १० अशा चार वेळा कोरोना रुग्णांची संख्या जाहीर केली. त्यामुळे दिवसभरातील एकूण रुग्णसंख्या २१ झाली. जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या ४५८ इतकी झाली आहे. यातील ३३४ रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. १०४ रुग्णांवर कोविड सेंटर तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर २२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी (ता.सहा जुलै) दिवसभरात चार टप्प्यात आलेल्या अहवालात नांदेड महापालिकेचे उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांच्यासह २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दहा दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. लॉकडाउन शिथिल केल्याचा हा परिणाम असल्याची शक्यता वर्तविली जात असताना काहीजण हवेतूनही संसर्ग होत असल्याचे सांगत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्यापपर्यंत अधिकृत स्पष्टिकरण दिलेले नाही.
हे वाचलेच पाहिजे - नांदेड शहरात मीनरल वाॅटरचा गोरखधंदा कसा होतो?, ते वाचाच
कॉग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काळजीचे वातावरण
पालकमंत्री अशोक चव्हाण, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हबर्डे, माजी महापौर अब्दुल सत्तार, त्याचे चिरंजीव व नगरसेवक अब्दुल गफार, माजी नगरसेवक रहिमखान या कॉंग्रेस पुढाऱ्यांपाठोपाठ मनपाच्या उपमहापौरांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उपमहापौरांचा अहवाल पॉझिटिव्ह
आधीचे सर्व कॉंग्रेस पुढारी कोरोनामुक्त होवून घरी परतल्यानंतर उपमहापौरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माजी महापौर पुत्राच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी गेल्या दहा दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात स्वतःला क्वारंटाईन करून घेतले होते. या कालावधीत ते कुटुंबिय किंवा इतर कोणाच्याही संपर्कात आले नाही. यापूर्वीचे दोन वेळा दिलेले त्यांचे नमूने निगेटीव्ह आले. तिसऱ्या तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.