धक्कादायक : नांदेडचा ‘हा’ आमदार पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या पोहचली ३४८ वर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

नांदेडचे एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. निळकंठ भोसीकरयांनी सांगितले.

नांदेड : कोरोनाने आपले हाताय मजबूत केले असून कोरोना बाधीत माजी महापौर व त्यांचे पुत्र नगरसेवक यांच्या संपर्कात आलेले नांदेडचे एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. निळकंठ भोसीकरयांनी सांगितले. शुक्रवारी (ता. २६) रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये आमदार पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याची रुग्ण संख्या ही ३४८ वर पोहचली आहे. 

कोरोना आजारातून शुक्रवारी (ता. २६) पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील दोन आणि डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील एक असे एकूण तिन बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३४८ बाधितांपैकी एकूण २७० व्यक्ती कोरोनातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
  
जिल्ह्यात मृतकांचा आकडा १६ वर

शुक्रवारी (ता. २६) दोन पॉझिटीव्ह बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उमर कॉलनी येथील ५४ वर्षाचा एक पुरुष व गुलजारबाग नांदेड येथील ६५ वर्षाचा एका पुरुषांचा यात समावेश आहे. हे दोन्ही बाधित डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचार घेत होते. दोन्ही बाधितास उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. जिल्ह्यात आतापर्यत कोरोनामूळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. औषधोपचार चालू असलेल्या ६२ बाधितांपैकी सह बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात वय ५० व ५५ वर्षाच्या दोन स्त्री व ३८, ४२, ६७ व ७५ वर्षाचे चार बाधित पुरुषांचा समावेश आहे.

काही रुग्ण औरंगाबाद तर काही सोलापूर

नांदेड जिल्ह्यात ५५ बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १३, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ३५ तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे एक  बाधित व्यक्ती उपचार घेत असून तिन बाधित औरंगाबाद आणि एक बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत.

हेही वाचा -  ईपीएफ योजनेच्या लाभापासून महालॅबचे कर्मचारी वंचित

जिल्ह्याची कोरोना विषयी आकडे बोलतात

सर्वेक्षण- एक लाख ४६ हजार ४४४,
घेतलेले स्वॅब- ६ हजार ४७,
निगेटिव्ह स्वॅब- ५ हजार २४९,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- १०५,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ३४८,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- १६,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- २७०,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ६५,

 जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: Nanded's this MLA positive, patient number reaches 348 nanded news