नांदेडमध्ये सर्पदंशाने तिघांचा बळी, आमदार हंबर्डे यांच्याकडून कुटुंबियांचे सांत्वन

प्रल्हाद कांबळे
Sunday, 23 August 2020

ता. २० ऑगस्ट रोजी पुणेगाव येथील प्रगती गोविंद पुयड (वय आठ) व तिची बहीण पौर्णिमा गोविंद पुयड (वय सहा) ह्या दोघी बहिणी घरात झोपल्या होत्या. यावेळी रात्री विषारी सापाने घरात घुसुन या चिमुकल्या दोन्ही बहिणीच्या हाताला चावा घेतला.

नांदेड : नांदेडपासून जवळच असलेल्या धनेगाव- मुझामपेठ व पुणेगाव येथे सर्पदंशाने घेतला चार जणांचा चावा. त्यात दोन चिमुकलीसह एका तरुणाचा मृत्यू झाला. एका चिमुकलीवर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांनी मयतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. 

ता. २० ऑगस्ट रोजी पुणेगाव येथील प्रगती गोविंद पुयड (वय आठ) व तिची बहीण पौर्णिमा गोविंद पुयड (वय सहा) ह्या दोघी बहिणी घरात झोपल्या होत्या. यावेळी रात्री विषारी सापाने घरात घुसुन या चिमुकल्या दोन्ही बहिणीच्या हाताला चावा घेतला. यामध्ये छोटी बहिण प्रगती हीचा जागीच मृत्यू झाला. तर पौर्णिमा ही विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचार घेत आहे. 

हेही वाचा -  मोहरमसुद्धा साध्‍या पद्धतीने साजरा करा- एसपी विजयकुमार मगर

धनेगाव येथिल नवीन मुजामपेठ भागातील घटना

त्याच दिवशी रात्री धनेगाव येथिल नवीन मुजामपेठ भागात राहणाऱ्या सिमरन महंमद नासेर (वय चार) हिला पण पहाटे चारच्या सुमारास सापाने दंश केल्याने तीचासुद्धा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तोच साप शेजारी असलेल्या शेख मुस्तफा शेख पाशा (वय ३१) हा झोपेत असताना त्यालाही सापाने चावा घेतल्यामुळे त्याचाही जागीच मृत्यू झाला. अंत्यविधीनंतर वाजेगाव जिल्हा परिषदचे सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयताच्या नातेवाईकांना दिलासा दिला. मुख्यमंत्री निधीतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी पावसाळा असल्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन

यावेळी त्यांच्यासमवेत प्रभारी तहसिलदार सारंग चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, सरपंच दिलीप गजभारे, उपसरपंच पिंटू पाटील शिंदे, तलाठी सचिन पाटील नरवाडे, शिवलिंग घनतोड, राष्ट्रवादीचे गंगाधर कवाळे, सामाजिक कार्यकर्ते शेख एजाज यांच्यासह पुणेगाव, मुजामपेठ येथील नागरिक उपस्थित होते. नांदेड दक्षिण मतदारसंघातील नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी पावसाळा असल्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन आमदार मोहन हंबर्डे यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snake bite kills three in Nanded, MLA Humberde offers condolences to families nanded news