esakal | देगलूर तालुक्यात सहा हजार हेक्‍टरवर करडइची पेरणी; लाकडी घाण्यावरील तेलाचे केले मूल्यवर्धन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

करडई पिकाकडे वाढला शेतकऱ्यांचा कल

देगलूर तालुक्यात सहा हजार हेक्‍टरवर करडइची पेरणी; लाकडी घाण्यावरील तेलाचे केले मूल्यवर्धन

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर/ प्रमोद चौधरी

नांदेड : प्रयोगशीलता अंगी बाळगून वेगवेगळ्या पिकात बदल करण्याचे कसब असलेल्या देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा तब्बल सहा हजार हेक्‍टरवर करडीची पेरणी केली आहे. हरभरा पिकाला लागत असलेल्या मर रोगाला पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी करडई पिकाची निवड केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी लाकडी घाण्याव्दारे तेलाचे निर्मिती करून मूल्यवर्धन करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.


नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सिमेलगत असलेला देगलूर तालुका अवर्षणप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्‍यात ९० टक्के क्षेत्र निसर्गाच्या पाण्यावर म्हणजेच कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८७० मिलिमीटर आहे. असे असले तरी मागील अनेक वर्षापासून या भागात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे येथील शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला. या भागात शेतकरी प्रामुख्याने खरिपामध्ये मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कापूस, ज्वारी अशी पिके घेतात. तर रब्बी हंगामात हरभरा, रब्बी ज्वारी, गहू या सारखी पिके घेतात.
रब्बीत हरभरा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक असते.

हेही वाचा - शासकीय रुग्णालयाच्या धर्तीवर हैदरबागला सुविधा देण्याची अशोक चव्हाण यांची ग्वाही

देगलूर तालुक्याचा ६० टक्के भाग रब्बीसाठी प्रसिद्ध आहे. विशेषत: शहापूर परिसरात रब्बी पिके जोमात येतात. यात सर्वाधिक हरभरा पीक घेतले जाते. परंतु मागील काही वर्षापासून हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादनात सतत घट होत होती. यावर उपाय म्हणून पिकांमध्ये फेरपालट करण्याबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वेळोवेळी आवाहन करण्यात आले. यात शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला व रब्बी हंगामामध्ये करडइ पिकाची लागवड वाढविण्यास सुरुवात केली.

करडई पिकाची वैशिष्ट्ये

०- एसएसएफ - ७०८, पीबीएन १२ या वानाचा वापर
०- करडइची सलग क्षेत्रावर पेरणी
०- काही ठिकाणी आंतरपीक व बॉर्डर म्हणूनही पेरणी
०- सलग क्षेत्रात कम्बाईन हार्वेस्टर द्वारे काढणी
०- तुषार सिंचनाद्वारे मोजकेच पाणी
०- लाकडी घाणा तेल निर्मितीचे गटामार्फत नियोजन
०- कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या पीक स्पर्धेत सहभाग

आठ एकरात केली पेरणी
हरभरा पिकावर मर रोगाचे प्रमाण वाढल्यामुळे मागील वर्षापासून पिक बदल केला. मागील वषी तीन एकरवर करडइची पेरणी केली होती. यंदा त्यात वाढ करुन आठ एकरमध्ये पेरणी केली आहे. या भागातील करडइ उत्पादक शेतकरी मिळून तेलाचा घाणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
- लक्ष्मण चामावर (शाहापूर, ता. देगलूर)

संपादन- प्रल्हाद कांबळे