विशेष स्टोरी : रमजानमध्ये खजूर खाऊनच का सोडतात रोजा?

इस्लाम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरु झाला की शहरापासून खेड्यापर्यंत खजूर आणि फळांची आवक वाढते. सुक्या खजुराऐवजी पेंडखजूर किंवा खास सौदी अरेबिया, इराण, इराकमधील खजुरांची उपलब्धी रमजानमध्ये हमखास असतेच, रमजानमध्ये अगदी ४०-५० रुपये किलो पासून चार हजार रुपये किलोपर्यंत विविध प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध असतात.
खजूर
खजूर

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : इस्लाम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरु झाला की शहरापासून खेड्यापर्यंत खजूर आणि फळांची आवक वाढते. सुक्या खजुराऐवजी पेंडखजूर किंवा खास सौदी अरेबिया, इराण, इराकमधील खजुरांची उपलब्धी रमजानमध्ये हमखास असतेच, रमजानमध्ये अगदी ४०-५० रुपये किलो पासून चार हजार रुपये किलोपर्यंत विविध प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध असतात. रमजानचे रोजे खजूर खाऊन सोडण्याचा ‘सुन्नत’ म्हणजेच प्रेषितांचा रिवाज किंवा पद्धत आहे.‘एका हदीस प्रमाणे प्रेषित मुहंमद ( स. ) आपला रोजा पिकलेले खजूर खाऊन सोडत असत. तेही मगरीबची नमाज पढण्याआधी. जर पिकलेले खजूर उपलब्ध नसतील तर ते सुके खजूर खात असत. जर तेही उपलब्ध नसतील तर ते थोडेसे पाणी पिऊन आपला रोजा इफ्तार करीत.’

नैसर्गिक साखरेचा चांगला पुरवठा

जेव्हा एखादी व्यक्ती रोजा करते तेव्हा जवळपास १२ ते १६ तास त्याचे पोट रिकामे असते. त्यामुळे आपोआपच रोजाधारकाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होत जाते. तेव्हा रोजा इफ्तारच्या वेळेला खजूर सेवन केल्याने त्वरित नैसर्गिक साखरेचा चांगला पुरवठा शरीराला मिळतो. कारण रोजाधारकास ताबडतोब अतिरिक्त ऊर्जेची गरज असते. ती ऊर्जा खजुरातून मिळणाऱ्या साखरेच्या प्रमाणाने सहज उपलब्ध होते. इफ्तारनंतर लगेच मगरीबची नमाज आणि त्यानंतर ईशाची व तरावीहची प्रदीर्घ नमाज असते. त्यासाठी आणि इफ्तारनंतरसुद्धा ऊर्जेची गरज असते. आपण जेव्हा खातो तेव्हा ते अन्न पचवण्यासाठी सुद्धा खूप ऊर्जा लागते. पण रोजा सोडताना खजुराचा वापर केल्यास पचनक्रिया सहज होण्यास, १२ ते १५ तासांनंतर ती पुन्हा सुरु होण्यास खूप मदत मिळते.

हेही वाचा - धडाकेबाज कारवाई : जबरी चोरीतील तीन टोळ्या जेरबंद; 11 गुन्हे उघडकीस- नांदेड स्थानिक गुन्हे शाखा

खजुराचे फायदे-

१) खजुरामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. तसेच बी-६, फॉलिक ॲसिड,पोटॅशियम, नैसर्गिक सोडियम, लोह आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आढळते.

२) खजुरामध्ये अत्यंत चांगल्या प्रमाणात ‘फायबर’ही आढळते. या फायबरनाच ‘तंतुमय’ पदार्थ म्हटले जाते. खजुरातील या तंतुमय पदार्थामुळेही खूप फायदा होतो. रोजाच्या अवस्थेत पाण्याचा थेंबही न प्यायल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण थोडे कमी होते. त्यामुळे बद्धकोष्ठताही होण्याची शक्यता असते; परंतु खजुरातील तंतुमय घटकांमुळे बद्धकोष्ठता नाहीशी होते.

३) खजूर पचायला अत्यंत सोपे असतात.

४) खजूर सेवनाने भुकेची तीव्रता आपोआप कमी होते. त्यामुळे रोजाधारकाचे अति खाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पोट बिघडणे साहजिकच घडत नाही.

५) १२ ते १५ तासांच्या रिकामेपणानंतर खजूर सेवनाने पोट (जठर) पचनक्रियेस आणि अन्न प्राप्त करण्यास तयार होते. जठरातील पाचक रस पचनासाठी सोडण्यास जठर तयार होते.

६) इतक्या तासांनंतर मेंदू आणि मज्जातंतूंना साखर तत्परतेने हवी असते. ही साखर खजुराच्या माध्यमातून उपलब्ध होते.

७) मांसाहार आणि शर्करायुक्त पिष्टमय पदार्थांच्या सेवनाने तयार होणाऱ्या आम्लाचा परिणाम रोखण्यासाठी खजुरातील अल्क अत्यंत प्रभावी ठरते.

पवित्र कुरआनमध्ये खजूर आणि खजुराच्या झाडाचा उल्लेख!

पवित्र कुरआनमध्ये खजूर आणि खजुराच्या झाडाचा उल्लेख २० वेळा आला आहे. यावरुन खजुराचे महत्त्व लक्षात येते. प्रेषित मुहंमद (स.) यांना चांगल्या मुस्लिम माणसाला खजुराच्या झाडाची उपमा द्यायला आवडे. ते म्हणत,‘सर्व झाडांमध्ये मुस्लिमांसारखे एक झाड आहे.त्याची पाने कधी गळत नाहीत. प्रेषितांच्या पत्नी आणि मुस्लिमांच्या माता आयेशा (र.) ज्या कोणाला चक्कर येते त्याला खजूर खाण्याचा सल्ला देत असत. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील साखरेचे प्रमाण किंवा ब्लड प्रेशर कमी झाल्यास चक्कर यायला सुरुवात होते. पण खजूर सेवनाने त्वरित बरे वाटते. खजुरामध्ये कॅल्शियमचे प्रमाणही बऱ्यापैकी असल्याने खजूर सेवनाने हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे खजूर सेवनाने दृष्टिदोष कमी होतो आणि रातआंधळेपणापासूनही माणसाचे संरक्षण होते. प्रेषितांनंतरच्या काळात इस्लामी फौजांना खजूर हे अन्नपदार्थ म्हणून दिले जात असत. तसेच लहान मुले,स्त्रिया,ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीही खजूर सेवन फायद्याचे ठरते.

‘जो रोज सकाळी सात खजूर सेवन करील त्याचे विषबाधा आणि मत्सरापासून संरक्षण होईल.’

प्रेषित मुहंमद ( स. ) कधी कधी भाकरीबरोबर खजूर खात, तर कधी पिकलेले खजूर आणि काकडी एकत्र करुन खात असत, तर कधी खजूर आणि तूप मिसळून खात. वेगवेगळ्या प्रकारचे खजूर ते सेवन करीत; पण ‘अजवा’ या प्रकारचे खजूर त्यांना सर्वात जास्त आवडत. एका हदीसनुसार प्रेषितांनी म्हटले आहे, ‘जो रोज सकाळी सात खजूर सेवन करील त्याचे विषबाधा आणि मत्सरापासून संरक्षण होईल.’दुसऱ्या एका हदीसनुसार, ‘खरोखरीच खजुरांमध्ये बरे करण्याची क्षमता आहे.’(बुखारी,मुस्लिम) खजूर खाण्याचे शास्त्रीय फायदे जरी बहुतेक मुस्लिमांना माहिती नसले तरी प्रेषितांची आज्ञा आणि त्यांचे अनुकरण म्हणून समस्त मुस्लिम समाज रोजा सोडण्यासाठी शक्यतो खजुराचाच उपयोग करतात आणि आपल्या पदरी प्रेषितांचे अनुकरण केल्याचे पुण्य पाडून घेतात.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com