
धुळीमुळे बसची ट्रकला पाठीमागून धडक, राज्य परिवहन महामंडळाकडून जखमी प्रवाशांना तातडीची प्रत्येकी पाचशे रुपयाची मदत
माहूर (जिल्हा नांदेड) : माहूर- किनवट महामार्गावर नखेगाव फाट्याजवळ एस.टी. बसने सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागुन धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात ४३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचाराकरिता माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी (ता. ११) सकाळी बाराच्या सुमारास घडला.
माहूर- किनवट महामार्गाच्या रस्त्याचे काम मंद गतीने सुरु आहे. रस्त्याच्या कामामुळे रस्त्यावरुन एखादे वाहन गेले की समोरुन कोणते वाहन येत आहे हे दिवसासुध्दा दिसत नाही. धुळीमुळे वाहन चालक, नागरिक त्रस्त झाले आहेत. धुळीमुळे त्वचारोगाचे आजार होत आहेत. बुधवारी (ता. ११) सकाळी बारा वाजताच्या सुमाारस माहूर जवळील नखेगाव फाट्याजवळ किनवट- औरंगाबाद एस. टी. बस ( एमएच २० बीएल ३१३४) रस्त्यावरिल धुळीमुळे समोर असलेला ट्रक (टिएस ०१ युएल १७९९) न दिसल्याने बसने ट्रकला पाठीमागुन धडक दिली. अपघातात बसमधील ४३ प्रवासी जखमी झाले.जखमी प्रवाशांना तातडीने माहूर येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. अपघातामुळे बसचे पुढील दोन्ही काचा फुटल्या आहेत.
हेही वाचा - हिंगोलीत दिवाळीचा बाजार फुलला, खरेदीसाठी नागरिक बाजारात
माहूर येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एन. भोसले, डॉ. अभिजीत अंबेकर यांनी उपचार केले. रुग्णालयात माहूर एसटी आगारप्रमुख व्ही. टी. धुतमल, स्थानकप्रमुख व्ही. एन. जावळे, प्रविण पाईकराव, डी. एस. कोकणे, श्री देशमुख, श्री करपे, प्रभारक आर. जी. पाटील यांनी भेट देऊन जखमी प्रवाशांना तातडीची प्रत्येकी पाचशे रुपये आर्थीक मदत दिली आहे.
माहूर- किनवट महामार्ग रस्ता हा जिवघेना झाला असून दररोज अपघात होत आहेत. प्रचंड धुरळा रस्त्यावर असल्याने दिवसा वाहनधारकांना लाईटचा वापर करुनही समोरचे वाहन दिसेना त्यामुळे अपघात होत आहेत. रस्त्यावर पाण्याचे टॅंकर फिरविल्यास धुरळा उडणार नाही. अपघातही होणार नाही पण कंत्राटदार याकडे साफ दुर्लक्ष करीत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणे सुरु आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे