एसटीच्या तिकीट मशीन झाल्या ‘हॅंग’, स्मार्ट कार्ड लागेना

File photo
File photo

नांदेड : एसटी महामंडळात चार वर्षांपूर्वी तिकीट ट्रेच्या ऐवजी ‘ईटीआयएम’ मशीन आल्यात. आतापर्यंत मशीन व्यवस्थित सुरू होत्या. मात्र, आता हळूहळू अनेक अडचणी मशीनमध्ये येत आहेत. एसटीने ज्येष्ठांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत स्मार्ट कार्ड दिले. परंतु, हे अत्याधुनिक स्मार्ट कार्ड मशीनवर चालतच नाही. तर काही मशीन ‘हॅंग’ होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. 

एसटी महामंडळाने काळानुरूप काही बदल आपल्या यंत्रणेत केले आहेत. त्याचे फायदेही झालेत. असे असले तरीदेखील देखभाल दुरुस्तीअभावी आता तोटेही समोर येत आहेत. चार वर्षांपूर्वी एसटीच्या ताफ्यात प्रवाशांना तिकीट देण्यासाठी मशीन दाखल झाल्या आहेत. त्यातील अनेक मशीनमध्ये आता बिघाड सुरू झाले आहेत. प्रिंटर काम न करणे, बॅटरी, मशीन हॅंग होणे, निपॅड अशा अनेक अडचणी उद्‌भवू लागल्या आहेत. त्यातच एसटी महामंडळाने स्मार्ट कार्डचा वापर सुरू केला आहे. मात्र, मशीन जुन्या झाल्याने कार्डची एंट्री त्यावर होत नसल्याच्या व मशीन हॅंग होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याचा त्रास प्रवाशांसोबतच वाहकांनाही होत आहे. 

वाहक व प्रवाशांमध्ये होताहेत वाद
ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डची एंट्री होत नसल्याने अर्धीतिकीट दिले जात आहे. त्यामुळे कार्डमध्ये दिलेले अंतर जसाच्या तसेच राहत आहे. याशिवाय, विद्यार्थी, मासिक, त्रैमासिक पासधारकांनाही अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधी रक्कम भरून पास घेतल्यानंतरही स्मार्ट कार्डची एंट्री न झाल्यास वाहक व प्रवाशामध्ये वादावादी होत आहे. त्यामुळे आता मशीनला ‘अपडेट’ करण्याची वेळ आली असल्याची मागणी वाहकांकडून होत आहे. 

राज्यभरात अडचणी 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात तिकिटासाठी मशीनचा वापर केला जात आहे. साधारणतः: चार वर्षांपूर्वी महामंडळाच्या ताफ्यात मशीन दाखल झाल्या. आता राज्यभरातूनच वाहकांच्या तक्रारी होत आहेत. असे असले तरी तात्पुरती दुरुस्ती करून वेळ ढकलली जात आहे. सद्यस्थितीत नादुरुस्त मशीनची संख्या मोठी आहे. त्याकडे लक्ष देऊन अपडेटेड मशीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाहकांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com