मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार निष्क्रिय ;  देवेंद्र फडणवीस 

प्रमोद चौधरी
Monday, 23 November 2020

सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्याच्या महाविकास आघाडीला मराठा आरक्षण टिकविता आले नाही. हे निष्क्रिय सरकार असल्यामुळेच मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली, अशी स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

नांदेड : आतापर्यंत मराठा समाजाचे मुख्यमंत्री होऊन गेले. परंतु, मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही. भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर मराठा समाजाला इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता आरक्षण दिले. सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकवले. परंतु, सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्याच्या महाविकास आघाडीला ते टिकविता आले नाही. हे निष्क्रिय सरकार असल्यामुळेच मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली, अशी स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजप, रिपाई, रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिरीष भास्करराव बोराळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सोमवारी (ता.२३) ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उमेद्वार शिरीष बोराळकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील, माजी खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, भीमराव केराम, तुषार राठोड, राजेश पवार, माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजपा महाराध्यक्ष प्रविण साले आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. 

हेही वाचा - नांदेड : एकाची आत्महत्या तर दुसऱ्याचा तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू. धर्माबाद तालुक्यातील घटना

जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उमेद्वार शिरीष बोराळकर यांनी भाषण केले. मागील वर्षी म्हणजे जून २०१४ मध्ये झालेल्या पदवीधर निवडणूक मला अगदी काठावर पराजय स्वीकारावा लागला आहे. यावर्षी मात्र पोषक वातावरण असून मला सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडून द्यावे, मी ‘गुत्तेदारी करणार नाही’ असे आश्वासन दिले. रावसाहेब दानवे म्हणाले की, सध्या राज्यातील राजकारणाचे वारे कोणत्या दिशेने सुरु आहे, ते पदवीधरांच्या निवडणूकीतून दाखवून द्यावे, असे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले. 

हे देखील वाचा - नांदेड जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी जनतेचे हालच

राज्य सरकारमध्ये बोलघेवडे मंत्री 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन करण्यात आला. या काळामत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांना सावरण्यासाठी, आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना आणल्या. आणल्याच नाहीतर प्रत्यक्षात त्याची अमलबजावणीही झाली. परंतु, राज्य सरकारने आश्वासनापलिकडे काहीच केले नाही. त्यामुळे या सरकारमधील मंत्री केवळ बोलघेवडे असल्याची टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

यंदा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पोषक वातावरण आहे. नुकत्याच झालेल्या बिहारसह उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि मणिपूर या निवडणूकीत भाजपने बाजी मारून कॉंर्ग्रेसचे पानिपत केले. आता मराठवाडा पदवीदर मतदारसंघाच्या निवडणुकीतही शिरीष बोराळकर यांना निवडून द्यावे. 
- देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Government Inactive For Maratha Reservation Nanded News