अट्टल गुन्हेगार विक्की चव्हाण गोळीबारात ठार

प्रल्हाद कांबळे
Monday, 3 August 2020

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत फायरिंग, गंभीर जखमीचे केले हल्लेखोरांनी अपहरण, घटनास्थळावरुन पिस्तुल व जीवंत काडतूस आणि खंजर जप्त. 

नांदेड : शहराच्या विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत शंकरराव चव्हाण चौक गाडेगाव रस्त्यावर रविवारी (ता. दोन) रात्री झालेल्या गोळीबारात कुख्यात आरोपी विक्की चव्हाण हा ठार झाल्याची माहिती पोलिस निरिक्षक संजय ननवरे यांनी दिली. मात्र मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह आपल्या वाहनात टाकून पुरावा नष्ट करण्यासाठी हस्सापूर (ता. नांदेड) शिवारात नेऊन टाकला. ही घटना सोमवारी (ता. तीन) सकाळी सहा वाजता उघडकीस आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केला आहे. मात्र या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. सध्या तरी या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही. 

शहर व जिल्ह्यात गॅंगवार तयार करुन एखाद्या कुख्यात आरोपीच्या नावाचा वापर करुन काही तरुण गुन्हेगारीकडे वळले आहेत. यातच पिस्तुल व खंजर, तलवार हे घातक शस्त्र शहरात सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे सर्वसाधारण तरुण या शस्त्रांचा वापर करुन गुन्हेगारीकडे वळत आहेत. नांदेड शहरात गॅगवारवरन श्रेयवाद सुरू आहे. यातूनच रविवारी (ता. दोन) कुख्यात व अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला विक्की चव्हाण याच्यावर त्याच्या विरोधकांनी शहरापासून जवळच असलेल्या शंकरराव चव्हाण चौक, गाडेगाव रस्ता येथे गोळीबार केला. यात विक्री चव्हाण हा गंभीर जखमी झाला. हल्लेखोरांनी त्याला आपल्याच चारचाकी वाहनात टाकून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अपहरण केले. मात्र विक्की चव्हाण या हल्ल्यात ठार झाल्याने त्याला हस्सापूर (ता. नांदेड) परिसरातील खंडेराय होळकर चौकासमोर गोदावरी पुलाजवळ फेकून दिले. 

हेही वाचा -  नांदेड : नोकरीचे आमिष दाखवून दिड लाखाने गंडविले, दोघांविरुध्द गुन्हा

घटनास्थळावरुन पिस्तुल, खंजर व जीवंत काडतूस जप्त

ही घटना घडल्यानंतर पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्यासह आदी वरिष्ठ अधिकारी यांनी रात्रीच घटनास्थळाला भेट दिली. विक्की चव्हाण याची दुचाकी तिथेच पडली होती. पोलिसांनी ती दुचाकी जप्त करुन रात्री नाकाबंदी लावून शहरात बंदोबस्त वाढविला होता. हल्लेखोरांनी ज्याच्यावर गोळीबार केला त्यालाच पळविल्याने पोलिसांनीही घटनेचा शोध सुरु केला. रात्रभर पोलिसांचे विविध पथक शहरात व परिसरात गस्त घालत होते. सोमवारी (ता. तीन) सकाळी सहाच्या सुमारास हस्सापूर शिवारात एक मृतदेह असल्याची माहिती विमानतळ पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी जावून पाहिले तर गोळीबारात ठारा झालेला हाच तो विक्की उर्फ विकास रामसिंग चव्हाण (वय २९) रा. चिखलवाडी असल्याची खात्री पटली. पंचनामा करुन त्याचा मृतदेह शासकिय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. 

विक्की चव्हाण हा सराईत गुन्हेगार 

विक्की चव्हाण हा शहर व जिल्ह्यातील विविध गंभीर गुन्ह्यात अडकलेला होता. त्याच्यावर खून, दरोडा, खूनाचा प्रयत्न, घरफोडी असे विविध गुन्हे दाखल होते. नुकताच त्याच्यावर स्थानिक गुन्हे शाखेने लिंबगाव पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. शहराच्या शिवाजीनगर, वजिराबाद, विमानतळ, नांदेड ग्रामिण, इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होते. तो कारागृहात असताना त्याच्या नावाचा वापर त्याच्या टोळीतील सदस्य करुन अनेकांना खंडणी मागत असत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strong criminal Vicky Chavan shot dead nanded news