नेटवर्कसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी माळरानावर

प्रमोद चौधरी
Thursday, 27 August 2020

ऐपत नसतानाही कर्जबाजारी होऊन कित्येक पालकांनी आपल्या पाल्याची ऑनलाइन शैक्षणिक सोय केली; परंतु सोशल नेटवर्किंग साइटमुळे ऑनलाइन शिक्षणाची पुरती वाट लागली आहे.

नांदेड : कोरोनाच्या महामारीने यंदा विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची वाट धरावी लागली. त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या स्मार्टफोनसाठी पालकांना आपल्या पाल्याच्या हातात महागडे स्मार्टफोन द्यावे लागले; तसेच इंटरनेट सेवेसाठीही पैसे मोजावे लागले आहेत; परंतु नेटवर्क कुचकामी पडत असल्याने विद्यार्थ्यांना नेटवर्क सर्चिंगसाठी माळरानावर भटकावे लागत आहे. 

सध्या इंटरनेटचे युग असल्याने सोशल नेटवर्क साइट वापरकर्त्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. प्रत्येकजण ऑनलाइन प्रणालीने जोडला गेल्याने सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांची दमछाक होता दिसून येत आहे. अशातच यामध्ये आता विद्यार्थ्यांची भर पडत आहे. कंपन्यांचे नेटवर्क सैरभैर झाल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. वारंवार नेटवर्कची सेवा खंडित होत असल्याने शाळेमार्फत वाढविण्यात येत असलेला अभ्यासक्रम पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह ओसरत चालला असून, सुरवातीलाच विद्यार्थ्यांना या ऑनलाइन शैक्षणिक प्रणालीचा कंटाळा आल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात भोसी येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरु करणार-  पालकमंत्री अशोक चव्हाण

पर्यायाने विद्यार्थी शिक्षणापासून आपसूकच दुरावत असून, विद्यार्थ्यांचा कल इतर गोष्टींकडे वाढताना दिसून येत आहे. त्याप्रमाणे दुसरीकडे पालकांचीही चिंता वाढली असून, ऐपत नसतानाही कर्जबाजारी होऊन कित्येक पालकांनी आपल्या पाल्याची ऑनलाइन शैक्षणिक सोय केली; परंतु सोशल नेटवर्किंग साइटमुळे ऑनलाइन शिक्षणाची पुरती वाट लागली आहे. तेव्हा शासनाने पुढाकार घेऊन ग्रामीण भागात अतिरिक्त टॉवर उभारणी करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे. 

हे देखील वाचाच - वाहनधारकांसाठी गुड न्यूज : सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूकीला ३० सप्टेंबरपर्यंत करमाफी

आॅनलाइन शिक्षणामध्ये येतो व्यत्यय
माझा मुलगा इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे. शाळा बंद असल्याने ऑनलाइन क्‍लासेस सुरू आहे. परिस्थिती नसतानाही त्याला महागाचा मोबाईल घेऊन दिला; परंतु गावामध्ये अनेकदा नेटवर्क मिळत नसल्याने त्याच्या ऑनलाइन शिक्षणामध्ये व्यत्यय येत आहे. 
- सर्जेराव खरात. 
 
शाळेतच पर्यायी व्यवस्था करावी 
शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्येच तुकड्या पाडून ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था करावी. जेणेकरून आधीच हतबल झालेल्या ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक फरपट होणार नाही. 
- शकुंतलाबाई सूर्यवंशी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students From Rural Areas at Malrana for the network Nanded News