वाहून जाणाऱ्या मोटारसायकलस्वारास वाचविण्यात यश

nnd27sgp16.png
nnd27sgp16.png

सगरोळी, (ता. बिलोली, जि. नांदेड) ः शनिवारी मध्यरात्री ते रविवार पहाटेच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे लघूळ ते सगरोळी रस्त्यातील नाल्यावरील दोन्ही पूल वाहून गेले असून वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.  गेल्या बारा दिवसांत सगरोळी (ता.बिलोली) परिसरास पावसाने तिसऱ्यांदा झोडपले आहे. पंधरा दिवसांच्या उघडीपनंतर मंगळवारी (ता.१५) रोजी परिसरात अक्षरशः ढगफुटी झाली होती. केवळ चार ते पाच तासांतच मुसळधार पावसाने सगरोळीसह परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. सगरोळी, केसराळी व आदमपूर येथील नाल्यांना प्रचंड पूर आल्याने कार्ला फाटा ते आदमपूर फाटा हा राष्ट्रीय महामार्ग एक दिवस बंद झाला होता. 

दोन गावांतील संपर्क पूर्णतः तुटला 
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी (ता.२४) रोजी रात्री पुन्हा पावसाने झोडपल्याने कापलेले उडीद अक्षरशः वाहून गेले. रविवारी (ता.२७) पहाटे पुन्हा पावसाने रुद्रावतार दाखविला असून लघूळ ते सगरोळी रस्त्यावरील दोन्ही पूल वाहून गेले आहेत. केसराळी व आदमपूर येथील नाल्याला पुन्हा मोठा पूर आल्याने उरले सुरले पीकही वाहून गेले असून जमिनी खरडून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  लघूळ ते सगरोळी रस्त्यावरील दोन्ही पूल वाहून गेल्याने या दोन गावांतील संपर्क पूर्णतः तुटला आहे. लघूळ नजीकच्या नाल्यावरील पूल वाहून गेल्याने बिलोली, लघूळ व सगरोळीचा संपर्क तुटला आहे. 


अनेक शेतकरी अडकून पडले 
या पुलामध्ये मोटारसायकलस्वार वाहून जाताना नागरिकांनी त्याला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. लघूळ व सगरोळीदरम्यान असलेला सिद्धप्पा नाल्यावरील पूलदेखील वाहून गेल्याने या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. रात्री शेताकडे गेलेले अनेक शेतकरी अडकून पडले असल्याने त्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. पूल वाहून गेल्याची माहिती सगरोळी येथील सरपंच प्रतिनिधी व्यंकट पाटील सिद्नोड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. दोन्ही गावांची जवळपास पन्नास टक्के शेती या एकमेव असलेल्या स्त्यावरच असल्याने ऐन सुगीच्या दिवसांत हा रस्ता वाहून गेल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाल्याने त्वरित रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणीही केली आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com