यशस्वी भरारी : दहावी परीक्षेत अव्वल ठरलेली स्नेहल कांबळे काय सांगतेय तिच्या यशाची गोष्ट ? वाचा...

प्रल्हाद कांबळे
Friday, 31 July 2020

दरवर्षी निकालाच्या दिवशी शाळेत जशी गर्दी असते तशी दिसली नाही, मात्र विद्यार्थ्यांपासून शिक्षक, पालकांपर्यंत आत्मविश्वास पूर्ण आनंदात तसूभरही कमतरता झाली नाही.

नांदेड : नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली शाळेची द्वारे पुन्हा त्याच उत्साहाने उघडल्या गेली. निकाल ऑनलाईन असल्यामुळे दरवर्षी निकालाच्या दिवशी शाळेत जशी गर्दी असते तशी दिसली नाही, मात्र विद्यार्थ्यांपासून शिक्षक, पालकांपर्यंत आत्मविश्वास पूर्ण आनंदात तसूभरही कमतरता झाली नाही. या आनंदाच्या उत्सवात स्नेहल कांबळे या विद्यार्थींनीने पाचशे पैकी पाचशे गुण मिळवून नांदेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

नांदेड येथील शारदा भवन शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले विद्यालयाची स्नेहल ही विद्यार्थींनी. तिला या यशाबद्दल जेंव्हा बोलते केले तेंव्हा शिकवणींच्या आभासाला अधोरेखित करित ज्या प्रांजळपणे शाळेतील शिक्षकांना तिने श्रेय दिले ते कदाचित कोणाला पटणारही नाही. “माझी शाळा आणि माझ्या शाळेतील शिक्षकांनी वर्षेभर ज्या पोटतिडकिने आम्हाला शिकविले त्यांची तीच तळमळ डोळ्यासमोर ठेवून मी घरी प्रामाणिकपणे अभ्यास केला. अभ्यासाप्रती असलेला प्रामाणिकपणा इतर कुठल्या क्लासेसमधून न शिकता येणारा आहे. असे सांगत तिने अप्रत्यक्ष या साऱ्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षकांना व अभ्यासाप्रती बाळगलेल्या प्रामाणिक तळमळीलाही तिने बहाल केले. नांदेड जिल्हा माहिती कार्यालयामार्फत स्नेहल व तिचे वडिल मारोतीराव कांबळे    यांचा आज शाल व महात्मा गांधी यांचे पुस्तक देवून प्रातिनिधिक सत्कार केला. यावेळी ती बोलत होती.  

घरात लहानपणापासूनच शिक्षणाला पोषक वातावरण 

माझे घर केवळ दोन खोल्यांचे आहे. वडिल शिक्षक असल्याने घरात लहानपणापासूनच शिक्षणाला पोषक वातावरण आहे. या पोषक वातावरणात आम्हाला भौतिक सुविधेची कधी गरज भासली नाही. आहे त्या दोन खोल्यातचं जिथे जागा असेल तिथे मी मनापासून अभ्यास करित राहीले. अभ्यासासाठी मी कोणताही वेळापत्रक कधी निश्चित केले नाही. मनाला ज्या विषयाचा जेंव्हा अभ्यास करावसा वाटेल तेंव्हा त्या-त्या विषयाचा मी अभ्यास करत गेले, असे स्नेहल हिने आवर्जून सांगितले.

हेही वाचा - कंधारमध्ये का केली महिलेनी आत्महत्या? वाचा सविस्तर...

न चुकता मी पहाटे दोनला उठून दिवसभराचा अभ्यास करुन घ्यायचे

माझी शाळा दुपारची होती. सकाळी नाही म्हणायला एक ट्युशन लावली होती. मात्र शाळेतल्या शिक्षकांनी ज्या पद्धतीने प्रत्येक विषय डोक्यात बिंबविले त्यामुळेच मला एवढे घवघवीत यश संपादित करता आले, असे स्नेहल सांगते. विद्यार्थ्यांना अभ्यास हा मनातून करावसा वाटला पाहिजे. ज्यांना मनातून काहीच वाटत नाही ते अभ्यासातून होणाऱ्या समाजापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मी अभ्यास करतांना माझ्या ज्या शंका आहे त्या सर्व शंका शाळेतल्या शिक्षकांकडून दुरुस्त करुन घेत राहिले. यामुळे मला यात अधिक गोडी वाढत गेली. संपूर्ण दिवस शाळा व क्लासेस यांच्यात जाण्या- येण्यात खर्ची पडायचा यामुळे मला दिवसा तसा अभ्यासाला वेळ कधी घेता आला नाही. दिवसभराच्या या दगदगीमुळे मी रात्री लवकर म्हणजेच साडेसात ते आठला झोपी जायचे. मात्र दररोज सकाळी न चुकता मी पहाटे दोनला उठून दिवसभराचा अभ्यास करुन घ्यायचे असे स्नेहलने सांगितले.

वैद्यकिय शिक्षण घेऊन तिला मानसोपचार तज्ज्ञ व्हायचे

माझ्या पालकांनी मला कधीही अभ्यासाबाबत आग्रह धरला नाही. वडिल किनवटला आश्रमशाळेत शिक्षक असल्याने त्यांना कधी आम्हाला वेळ देता आला नाही. आठवड्यातून एक दिवस ते येत असल्यामुळे आम्हाला त्यांचा तेवढा वेळ पुरेसा होता. मी मोठे यश संपादीत करु शकते हे त्यांनी प्रत्येकवेळी माझ्या मनावर बिंबविले. यातूनच माझा आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळे मी हे यश संपादित करु शकले असेही ती कृतज्ञतेने जेंव्हा सांगत होती तेंव्हा नकळत तिच्या डोळ्याचे काठ ओले झाले. वैद्यकिय शिक्षण घेऊन तिला मानसोपचार तज्ज्ञ व्हायचे आहे. गणितात तिने चांगले गुण घेतल्यामुळे ती पीसीएमबी हा ग्रुप घेणार आहे. 

येथे क्लिक कराया शहरात साकारणार शांतीचे आकर्षक प्रतिक, कोणत्या ते वाचा..?

पालकमंत्री अशोक चव्हाणांनी साधला फोनवर संवाद

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी तिच्या या घवघवीत यशाबद्दल फोनवर संवाद साधून स्नेहल व तिचे वडिल मारोतीराव कांबळे यांचे अभिनंदन केले. “तु नांदेडच्या गौरवात भर घातली असून तुझ्या या यशाबद्दल कौतूक करावे तेवढे कमी आहे. मला तुझा व तुझ्या शिक्षकांचा अभिमान आहे” या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful What does Snehal Kamble who topped the 10th exam say about her success Read nanded news