ट्रॅफिक पोलिसांची अशीही संवेदनशीलता

सुरेश घाळे
Tuesday, 15 September 2020

त्याचे झाले असे की, ट्रॅफिक पोलिस कर्मचारी माधव पाटील व शिवाजी सूर्यवंशी हे दोघे बिद्राळी पोलिस चौकी ते धर्माबाद रस्त्यावर गस्त घालीत असताना बाळापूर शिवारात सोयाबीन पीक असलेल्या एका शेतात मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान कुत्र्यांनी एका काळविटाचा पाठलाग करून काळविटावर हल्ला सुरू केला. परिसरात सोमवारी रात्री सुरू झालेला पाऊस मंगळवारी सकाळीही सुरूच होता. त्यामुळे काळविटाला पळण्यास अडचण येत होती. त्याचवेळी गस्त घालीत असलेले ट्रॅफिक पोलिस माधव पाटील व सूर्यवंशी यांना रस्त्यावरूनच एका शेतात कुत्री आरडाओरड करून गोंधळ करीत असलेले दिसले. 
 
धर्माबाद, (जि. नांदेड) : धर्माबाद पोलिस ठाण्याचे ट्रॅफिक पोलिस कर्मचारी माधव पाटील खतगावकर व शिवाजी सूर्यवंशी या ट्रॅफिक पोलिस जोडीने एका काळविटाला चार - पाच कुत्र्यांच्या तावडीतून वाचविले आहे. ही घटना धर्माबाद ते बासर रस्त्यावर बाळापूर शिवारात मंगळवारी (ता.१५) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. काळवीट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहे. जखमी काळविटावर प्राथमिक उपचार करून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. जोरदार पावसात कोरोनाच्या धावपळीतही पोलिसांनी प्राण्यांविषयी दाखविलेल्या या संवेदनशीलतेची चर्चा होत आहे.

काळविटावर हल्ला 
त्याचे झाले असे की, ट्रॅफिक पोलिस कर्मचारी माधव पाटील व शिवाजी सूर्यवंशी हे दोघे बिद्राळी पोलिस चौकी ते धर्माबाद रस्त्यावर गस्त घालीत असताना बाळापूर शिवारात सोयाबीन पीक असलेल्या एका शेतात मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान कुत्र्यांनी एका काळविटाचा पाठलाग करून काळविटावर हल्ला सुरू केला. परिसरात सोमवारी रात्री सुरू झालेला पाऊस मंगळवारी सकाळीही सुरूच होता. त्यामुळे काळविटाला पळण्यास अडचण येत होती. त्याचवेळी गस्त घालीत असलेले ट्रॅफिक पोलिस माधव पाटील व सूर्यवंशी यांना रस्त्यावरूनच एका शेतात कुत्री आरडाओरड करून गोंधळ करीत असलेले दिसले.

 हेही वाचा -  धक्कादायक : बारडच्या कोविड केंद्रातून बाधित रुग्ण पळाला, गुन्हा दाखल -

कुत्र्यांना पिटाळून लावले
त्यावेळी त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता काळविटावर कुत्री हल्ला करून जखमी केलेले दिसून आले. लगेच त्यांनी काठी, दगड याच्या सहाय्याने कुत्र्यांना हाकलण्यास सुरवात केली. या वेळी कुत्रे त्यांच्यावरही धावून येत होती. परंतु या दोघा ट्रॅफिक पोलिस जोडीने प्रयत्न करून कुत्र्यांना पिटाळून लावले. यामुळे काळविटाचे प्राण वाचविले. माधव पाटील व सूर्यवंशी यांनी त्या जखमी काळविटास रस्त्याच्या बाजूला  घेऊन आले. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी राम रोंटे हे आपल्या चारचाकी वाहनाने बासरहून धर्माबादकडे येत होते. 

संवेदनशीलतेची चर्चा 
पोलिसांनी रोंटे यांना घडलेला प्रकार सांगून वाहनामध्ये जखमी काळविटाला घेऊन धर्माबादला आले. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष छोटू पाटील सुर्यवंशी यांना मोबाईलवरून माहिती दिली. लगेच छोटू पाटील यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पवळे व डॉ. शेख यांना बोलावून प्राथमिक उपचार केले. वनविभागाचे अधिकारी अंबुरे यांना माहिती देऊन त्या काळविटाला त्यांच्याकडे स्वाधीन केले. कोरोनाच्या धावपळीतही माधव पाटील खतगावकर व शिवाजी सूर्यवंशी या ट्रॅफिक पोलिसांनी प्राण्यांविषयी दाखविलेल्या या संवेदनशीलतेची चर्चा शहरासह तालुक्यात होत आहे.

संपादन - स्वप्निल गायकवाड
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Such Is The Sensitivity Of The Traffic Police, Nanded News