बोळकावासीयांची अशीही एकजूट

nnd7sgp04.jpg
nnd7sgp04.jpg


कुरुळा, (ता.कंधार, जि. नांदेड) ः आपण समाजाच्या जडणघडणीत महत्वाचे आणि अविभाज्य घटक आहोत. समाजातील दुःखी, वंचित कुटुंबाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेपोटी बोळका येथील गावकऱ्यांनी ब्लड कॅन्सर या दुर्धर आजाराशी झगडणाऱ्या विद्यार्थीदशेतील ओमकार कांबळेच्या उपचारासाठी मोठी आर्थिक मदत केली आहे. या कृत्यातून बोळकावासीयांच्या एकजुटीचे दर्शन होते. 


आर्थिक परिस्थिती बेताची 
कुरुळा येथून पाच ते सहा किमी अंतरावर असलेल्या बोळका या लहानशा गावातील ओमकार संजय कांबळे (वय १६) हा विद्यार्थी गावातील राजीव गांधी विद्यालयात दहाव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ओमकारला ताप येत होता. तो कमी होत नसल्याने औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात ल्युकेमिया ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाले. संजय कांबळे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून चरितार्थासाठी ते स्वतः सालगडी म्हणून कामाला आहेत. 


लोकवर्गणी मंदिरात जमा 
कुटुंबातील स्वतःची पत्नी, मोठा मुलगा व त्याची पत्नी दिवसभर मोलमजुरी करून जेमतेम जगण्याइतपत अर्थार्जन होते. अशा परिस्थितीत उपचारासाठी लाखो रुपये कसे जमवणार हा यक्षप्रश्न कांबळे कुटुंबासमोर होता. अशावेळी बोळका येथील स्व. राजीव गांधी विद्यालय येथील मुख्याध्यापक मारोती तुपकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरवातीला ११ हजार रुपयांची मदत जाहीर केली व इतर माजी विद्यार्थी आणि गावकऱ्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले. त्यास प्रतिसाद देत शाळेचे माजी विद्यार्थी व गावकऱ्यांनी केवळ दोन दिवसांत ८६६०० रुपयांची लोकवर्गणी मंदिरात जमा केली. 


ही रक्कम ओमकार कांबळेच्या उपचारासाठी पाठवण्यात आली असून त्याच्यावर मुंबई परेल येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असल्याचे गावकऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. या उपचारासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यासाठी बराच खर्च येणार आहे. यासाठी विविध सामाजिक संघटना, राजकीय पुढारी यांनी आर्थिक मदतीसाठी पुढे यावे, असे समस्त बोळकावासीयांच्या वतीने ‘सकाळ’च्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com