नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात करडईचे क्षेत्र वाढले 

प्रमोद चौधरी
Monday, 7 December 2020

नांदेड जिल्‍ह्यातील देगलूर तालुक्यात असलेल्या लिंगणकेरुर शिवारात अठराशे हेक्टरवर करडईचा पेरा वाढला असून धने लागवडही वाढल्याचे कृषी विभागाने सांगितले. 

नांदेड :  रब्बी हंगामात हरभरा, रब्बी ज्वारी, गहू पिकांचे आगार असलेल्या देगलुर तालुक्यामध्ये यंदा करडई खालील क्षेत्र वाढले आहे. आजपर्यंत जिल्ह्यात सर्वाधीक देगलूर तालुक्यात एक हजार आठशे हेक्टरवर करडई पिकाची पेरणी झाली आहे. यात कृषी विभागामार्फत राष्ट्रीय गळीत धान्य अभियानातून दोनशे हेक्टरवर करडई पिक प्रात्याक्षिक कार्यक्रम राबविल्याची माहिती देगलूर तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली. 

नांदेड जिल्ह्यात तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या देगलूर तालुक्यातील काळी जमिन रब्बी पिकांसाठी प्रसिध्द आहे. या भागात खरिपात उडीद, मुग, तूर यासारखी पिके घेतली जातात. यानंतर रब्बी हंगामात हरभरा हे पिक प्रामुख्याने घेतले जाते. परंतु मागील काही वर्षापासून हरभरा तसेच तुरीमध्ये मर रोगाची लागण होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन घटत आहे. यामुळे कृषी विभागाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने पिक बदलातून यावर तोडगा काढता येईल, असे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

हेही वाचा - नांदेड - रविवारी ३५ कोरोना बाधितांची भर, २९ बाधित कोरोनामुक्त

यावर उपाय म्हणुन शेतकऱ्यांनी करडई तसेच धने लागवड करण्याचे आवाहन केले. यामुळे यंदा देगलूर तालुक्यात एक हजार आठशे हेक्टरवर करडईची पेरणी झाली आहे. याला कृषी विभागाने दोनशे हेक्टरवर राष्ट्रीय गळीत धान्य योजनेतून दोनशे हेक्टरवर प्रात्याक्षीक कार्यक्रम घेतला आहे. 
  
घाण्याच्या तेलाला मागणी 
लाकडी घाण्यावरुन करडई तेल निर्मिती केल्यास लाकडी घाण्यावरिल तेलास मार्केट मध्ये चांगली मागणी आहे व चांगला दरही भेटतो. लाकडी घाणा निर्मितीसाठी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपणीस कृषि विभागाकडून पोकरा व स्मार्ट या योजनांमधून प्रकल्प खर्चाचे ६० टक्केपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. यासाठी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपण्यांनी पुढे यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

 

हरभरा पिकावरील रोगाचा परिणाम 
हरभरा पिकामध्ये मर रोग येत असल्याने पिकांच्या फेरपालटीमध्ये करडई व धने ही पिके घेतली जात आहेत. सध्या शहापुर परिसरामध्ये करडई तसेच धने पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. 
- शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी, देगलूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunfflower Area Increased In Deglur Taluka Of Nanded District