शोषितांसाठी झटणाऱ्या सुनिल ईरावारने जीवनयात्रा संपवली, काय आहे कारण? वाचा

प्रमोद चौधरी
Sunday, 16 August 2020

सुनिल ईरावार हे भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटना, किनवटचे तालुकाध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे किनवट शहराध्यक्ष होते.

गोकुंदा (जि. नांदेड) : येथील विश्रामगृहाच्या बाजूला राहणारे सामाजिक कार्यकर्ते सुनिल ईरावार (वय ३० वर्षे ) स्वातंत्र्य दिनाच्या सूर्यास्तानंतरच्या रात्री आपल्याच घरी गळफास लावून जीवन यात्रा संपविली.
              
रविवारी (ता. १६ )  सकाळी सातच्या सुमारास कुटूंबियांनी दरवाजा ढकलला तेव्हा सुनिलचा साडीने गळफास घेतलेला देह लटकतांना आढळून आल्याने हंबरडा फोडला. आजूबाजूला सर्वत्र गर्दी झाली. खबर मिळताच किनवट पोलिस घटनास्थळी आले, तेव्हा त्यांना सुसाईड नोट मिळाली. 

हेही वाचा - Nanded Corona : रविवारी १०२ रुग्ण झाले बरे, बाधित रुग्ण ९५ तर तिघांचा मृत्यू

काय लिहिले आहे सुसाईड नोटमध्ये 
‘‘...यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझं यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नये. 
आई मला माफ कर
तुझाच सुनिल
 
राज साहेब मला माफ करा
‘‘...राजसाहेब मला माफ करा.  आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण आहे आणि दोन्ही आमच्या जवळ नाही’’ .
जय महाराष्ट्र
जय राजसाहेब
जय मनसे

कुटुंबियांनीही माफ करावे
‘‘...आई-पप्पा, काका-काकू, मोठी वहिणी, छोटी वहिणी, शिवादादा, शंकरदादा, पापूदादा, मला माहित आहे. मी माफ करण्याच्या लायकिचा नाही; तरीपण तुम्ही मला माफ करसाल अशी अपेक्षा बाळगतो’’.

हे देखील वाचाच - मास्कनिर्मितीतून गरजू महिलांना मिळतोय रोजगार, कसा? ते वाचाच

ग्राम विकास, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा अशा विविध सामाजिक बाबींसाठी सदैव पुढाकार घेणारे सुनिल ईरावार हे भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटना, किनवटचे तालुकाध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे किनवट शहराध्यक्ष होते. त्यांचा सुस्वभाव व आपुलकीची वागणूक यामुळे तरुणांचा घोळका नेहमी त्यांच्या अवती भवती असायचा. त्यांच्या अकाली एक्झिटने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पोलिस अधिक तपास करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil Irawar Ended His Life Nanded News