सस्पेन्स, ड्रामा, ॲक्शनचा गोड शेवट लग्नबेडीत

शशिकांत धानोरकर
Sunday, 6 September 2020


 वारकवाडी (ता. हदगाव) येथील एका विवाहाच्या निमित्ताने सस्पेन्स, ड्रामा, ॲक्शनचा जबरदस्त थ्रिलर प्रत्ययास येऊन शेवट मात्र वधू-वर लग्नबेडीत अडकून गोड झाल्याची घटना शनिवारी (ता.पाच) घडली आहे. एखाद्या चित्रपटातील कथानकाला साजेसा अन् विविध घटना-घडामोडींनी रोचक व रंजक असलेला हा विवाह अनेक वऱ्हाडीच्या साक्षीने विधिवत संपन्न झाला.
 

तामसा, (ता.हदगाव, जि. नांदेड) : वारकवाडी (ता. हदगाव) येथील एका विवाहाच्या निमित्ताने सस्पेन्स, ड्रामा, ॲक्शनचा जबरदस्त थ्रिलर प्रत्ययास येऊन शेवट मात्र वधू-वर लग्नबेडीत अडकून गोड झाल्याची घटना शनिवारी (ता.पाच) घडली आहे. एखाद्या चित्रपटातील कथानकाला साजेसा अन् विविध घटना-घडामोडींनी रोचक व रंजक असलेला हा विवाह अनेक वऱ्हाडीच्या साक्षीने विधिवत संपन्न झाला.

 
वारकवाडी येथील ढोले कुटुंबातील उपवर मुलीसाठी चाभरा येथील भुरके कुटुंबाचा लग्नाचा मुलगा बघण्याचा कार्यक्रम पार पडला होता. मुलाच्या कुटुंबाकडून मुलीचे घर व मुलीच्या कुटुंबाकडून मुलाचे कुटुंब बघणे झाले. मुलाला मुलगी व मुलीला मुलगा पसंत झाला. नातेसंबंध जुळण्यासाठी सर्व गोष्टी अनुकूल वाटत असतानाच मुलाच्या कुटुंबाच्या राहत्या घरावरून बोलणे थांबले. यामुळे मुलगा व मुलगी कमालीचे नाराज झाले; पण दोघांनीही भावी जीवनात एकत्र येण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. म्हणूनच दोघांनाही एकमेकांशी संपर्क चालूच ठेवला असावा. कदाचित दोघांनाही ‘भगवान के घर देर है, अंधेर नहीं’ यावर विश्वास असावा. शुक्रवारी (ता.चार) रात्री एका घटनेमुळे या विवाहाची चक्रे जोराने फिरण्यास सुरवात झाली. 

पळून गेलेल्या तरुणांची ओळख पटली
रात्री गावपरिसरात एका दुचाकीवरून काही तरुण फिरण्याची बातमी गावभर पसरली. ‘चोर असावेत’ असे समजून सारा गाव जागी होऊन दुचाकीचा शोध सुरू झाला. ग्रामस्थ आपल्या दिशेने चोर समजून येत आहेत, हे लक्षात येताच दुचाकी सोडून सर्वांनी पळ काढला. मध्यरात्रीपर्यंत चोर पळवून लावले; पण दुचाकी ताब्यात घेण्याचा आनंद गावकऱ्यांना झाला. दुचाकी ग्रामपंचायतमध्ये कुलूपबंद करण्यात आली. शनिवारी (ता.पाच) सकाळी मात्र रात्री दुचाकी सोडून पळून गेलेल्या तरुणांची ओळख पटली. ते तरुण चोर नव्हते हे स्पष्ट झाले.  सारा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर चाभरा येथील मुलाचे कुटुंबीय व इतर नातेवाइकांना वारकवाडीमध्ये बोलावण्यात आले. गावात दोन्ही बाजूंनी शाब्दिक घासाघीस होऊन आरोप-प्रत्यारोप वाढले. शेवटी दुपारी प्रकरण तामसा पोलिस ठाण्यापर्यंत येऊन धडकले. 

हेही वाचा -  नांदेड जिल्हयातील तांड्यांचा चेहरा-मोहरा बदलणार, कसा? ते वाचाच

लग्नबेडीत अडकवण्याचे निश्चित 
सहायक पोलिस निरीक्षक नामदेव मड्डे यांनी दोन्हीकडील बाजू ऐकली. प्रकरण कारवाईपेक्षा तोंड गोड करण्यासारखे वाटले. याबाबत अखेर पोलिस ठाण्यात समोरील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात दोन्ही कुटुंबीय व त्यांच्या नातेवाइकांची तोडगा बैठक बसली. या वेळी पंचायत समिती सदस्य संदीप राठोड, पोलिस पाटील अनिल राठोड, सरपंच राम पवार, माधव ढोले, मारुती भिसे यांनी दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाच्या रेशीमगाठीद्वारे कायमचे नातेसंबंध प्रस्थापित करण्याचा विचार मांडला. राहत्या घरापेक्षा मुला-मुलींच्या मनात एकमेकांबद्दल जे घर निर्माण झाले होते, त्याची बाजू अखेर बळकट ठरली. अनेक ट्विस्ट बघायला मिळत असलेल्या या प्रकरणाचा शेवट गोड होण्याकडे वाटचाल झाली. दोन्ही कुटुंबांचे मनोमिलन होऊन अखेर उपवधू सखूबाई व उपवर नारायण यांना लग्नबेडीत अडकवण्याचे निश्चित झाले. 

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ 
सकाळपासूनचा आक्रमकपणा, संघर्ष, आरोप-प्रत्यारोप क्षणात गळून पडले. उपस्थितांनी लग्नाची तयारी चालवून वारकवाडी गाठली. तेथे नांदा-सौख्यभरेद्वारे दोन्ही कुटुंबं एकमेकांचे नातेवाईक बनले. अनेक दिवसांपासूनचा या लग्नातील चढ-उतार व दोन दिवसांतील थ्रिलरवर अखेर गोडपडदा पडला व सायंकाळी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या थाटात वधू आपल्या जीवनसाथीसह सासरी गेली. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Sweet Ending Of Suspense Drama Action At The Wedding, Nanded News