
नांदेड : मराठवाड्यातील नांदेड व परभणी जिल्ह्यात जून महिन्याच्या लागवड केलेल्या बीटी कपाशीमध्ये पाते फुले लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापणासाठी सामूहिकपणे एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब करुन किडींचा प्रादुर्भाव ओळखून उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक शिवशंकर चलवदे यांनी केले आहे.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावाचे निरीक्षण करण्यासाठी कपाशीच्या लागवडीच्या ४५ दिवसानंतर हेक्टरी पाच साम कामगंध सापळे व गुलाबी बोंडअळीचे पतंग नष्ट करण्यासाठी कपाशीच्या शेतात हेक्टरी ४० सापळे लावावे. पाच टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी किंवा आझार्डीरेक्टींन एक हजार ५०० पीपीएम ५० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे. बीटी कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीच्या अंडी अवस्थेत व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी किडीची दीड लाख अंडी प्रति हेक्टर ५० व ७० दिवसानंतर दोन वेळा वापर करण्यात यावा. आर्थिक नुकसानीची पातळी : आठ पतंग प्रति सापळे सतत तीन दिवस किंवा एकरी दहा फुले किंवा एकरी दहा बोंडे याप्रमाणे आढळून आल्यास रासायनिक कीटकांनाशकाची फवारणी करावी. थायोडीकार्ब ७५ टक्के पाण्यात विद्राव्य असणारी भुकटी २० ग्राम किंवा क्विंनालफोस २५ ईसी २० मिली प्रती १० लीटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
अळ्या बाहेर निघाल्यानंतर खोडातील गर खातात
सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. चक्रीभुंगा या किडीचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर उत्पादनांमध्ये ३० ते४० पर्यंत घट संभवते. ही कीड खोडावर दोन समांतर खापा करुन अंडी घालते. यामधून अळ्या बाहेर निघाल्यानंतर खोडातील गर खातात. त्यामुळे त्यावरील भाग सुकतो. आर्थिक नुकसानीची पातळी : एक मीटर ओळीमध्ये तीन ते पाच प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळल्यास उपाययोजना करावी.
व्यवस्थापन : पेरणी झाल्यानंतर सोयाबीन पीकास नत्रयुक्त (युरिया) खताचा वापर करु नये. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढतो. पीकाची कायिक वाढ अधिक होऊन उत्पादनामध्ये घट येते.
किटकनाशक : प्रोफेनोफोस ५० टक्के २० मिली किंवा इथिओन ५० ईसी ३० मिली किंवा थायाक्लोप्रीड २१.७ सीएस सहा मिली प्रती १० लीटर पाणी (साध्या पंपाकरीता) याप्रमाणात फवारणी करावी.
सोयाबीन वरील फुले, शेंगा खाणारी अळीचे व्यवस्थापन
सद्यस्थितीमध्ये सातत्याने ढगाळ हवामान असून अशा परिस्थितीमध्ये भविष्यात घाटेअळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फुले लागण्याच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास या अळ्या फुले खातात. सोयाबीन वाढलेल्या अवस्थेत या अळीचा फुलावर होणारा प्रादुर्भाव सहजरीत्या निदर्शनास येत नाही. याकरिता प्रादुर्भावाबाबत नियमित पाहणी करुन पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी. बिव्हेरिया बसीयाना ४० ग्राम किंवा इमामेक्टीन बेन्झोएट पाच एसजी साडेतीन ग्राम किंवा लामडा साय हलोथ्रीन ४.९ सीएस सहा मिली प्रती १० लीटर पाणी (साध्या पंपाकरीता) याप्रमाणात फवारणी करावी. किडींचा प्रादुर्भाव ओळखून व्यवस्थापन उपाययोजना करावी असे कापूस विशेषज्ञ, कापूस संशोधन केंद्र यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.