esakal | मास्तर तुम्हीबी : मुख्याध्यापक लाचेच्या जाळ्यात, काय आहे प्रकरण वाचा... 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई केंद्रीय प्राथमिक शाळा, पाळा, तालुका मुखेड येथे मंगळवारी (ता. एक) दुपारी करण्यात आली.

मास्तर तुम्हीबी : मुख्याध्यापक लाचेच्या जाळ्यात, काय आहे प्रकरण वाचा... 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : आपल्याच सहकाऱ्याच्या वेतनाचा धनादेश काढण्यासाठी सात हजाराची लाच मागणारा मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई केंद्रीय प्राथमिक शाळा, पाळा, तालुका मुखेड येथे मंगळवारी (ता. एक) दुपारी करण्यात आली. लाचखोर मुख्याध्यापकाविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पाळा तालुका मुखेड येथील केंद्रीय प्राथमिक शाळेवर मुख्याध्यापक म्हणून पुंडलिक रामजी टोके (वय ५३) रा. ओमनगर देगलुर हा कार्यरत होता. त्याच्याकडे त्याच शाळेतील तक्रारदार सहशिक्षक यांचा माहे जून २०२० चे वेतन झाले नव्हते. त्या महिन्याचे वेतन देण्यासाठी लाचखोर मुख्याध्यापक पुंडलिक टोके यांनी त्यांना सात हजार रुपयांची लाच मागितली. त्यापैकी सदर शिक्षकाने त्याला पहिला हप्ता म्हणून साडेतीन हजार रुपये दिले. परंतु उर्वरित रक्कम देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने ता. २८ ऑगस्ट रोजी नांदेड येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागात  रीतसर मुख्याध्यापक पुंडलिक टोकेविरुद्ध तक्रार दिली.

देगलूर पोलिस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल

तक्रार मिळताच पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या एका पथकाने पाळा (ता. मुखेड) शाळा परिसरात ता. २८ आॅगस्ट  रोजी पडताळणी सापळा लावला. या पडताळणी सापळ्यात लाचखोर पुंडलिक टोके याने उर्वरित राहिलेली साडेतीन हजार रुपये रक्कम स्विकारण्याचे निष्पन्न झाले. यावरुन मुख्याध्यापक पुंडलीक टोके याच्याविरुद्ध मंगळवारी (ता. एक) रोजी दुपारी पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्या फिर्यादीवरून देगलूर पोलिस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी घेतले परिश्रम

या कारवाईसाठी पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे व त्यांचे सहकारी कर्मचारी हनुमंत बोरकर, किशन चिंतोरे, गणेश केजकर आणि अमरजीतसिंह चौधरी यांनी परिश्रम घेतले.